आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विश्वास:जे पद मिळेल त्यातून विश्वास सार्थ ठरवेन : एकनाथ खडसे

जळगाव25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विधान परिषद निवडणुकीत निवडून आल्यानंतर मला जे काही पद मिळेल त्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांचा विश्वास सार्थ करून दाखवीन, असे विधान करीत एकनाथ खडसे यांनी ‘मंत्रिपदाचे’च संकेत दिले असे मानले जाते आहे. विधान परिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे एकनाथ खडसे आणि विधान परिषदेचे अध्यक्ष रामराजे निंबाळकर यांनी गुरुवारी विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यापूर्वी माध्यमांशी बोलताना खडसे म्हणाले की, भारतीय जनता पक्षात असताना देवेंंद्र फडणवीस यांनी आपल्याला राज्यपाल करण्यात येणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर राज्यसभेसाठी उमेदवारी दिली जाईल, असे सांगत राहिले आणि ऐनवेळी भागवत कराड यांना उमेदवारी दिली गेली. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचा त्याग करून नाइलाजाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात यावं लागलं. मी शरद पवार यांच्यावर आणि त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला. तो विश्वास सार्थ करण्याचा प्रयत्न मी करेन. सत्ता ही माझ्या दृष्टीने मोठी नाही, असेही विधान करून खडसे म्हणाले की, ज्या परिस्थितीत भाजपने मला ढकलले होते

त्यावेळी आधार देण्याचे, राजकीय पुनर्वसन करण्याचे काम शरद पवार यांनी केले ते माझ्यासाठी महत्त्वाचे आहे, असेही खडसे यांनी या वेळी बोलताना सांगितले.

गोपीनाथ मुंडे शहीद झाले...
पंकजा मुंडे यांना भाजपने उमेदवारी दिली नाही या संदर्भात पत्रकारांनी प्रतिक्रिया विचारली तेव्हा खडसे म्हणाले की, तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय असला तरी आपल्या दृष्टीने त्यांना उमेदवारी न देणे हा निर्णय दुर्दैवी आहे. भाजपला बहुजनांचा पक्ष बनवण्यात मुंडे, महाजन, खडसे आणि फुंडकर यांचेच योगदान आहे. त्यातही गोपीनाथ मुंडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांचा मृत्यू झाला नसून ते पक्षासाठी शहीद झाले आहेत, असेच आपले मत आहे. अशा माणसाच्या कुटुंबीयांना उमेदवारी नाकारणे दुर्दैवी आहे.

बातम्या आणखी आहेत...