आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावात नागरिकांचे आरोग्य धोक्यात:तीन फूट रुंद, पाच फूट खोल गटारीखाली जमिनीलगत काँक्रिट न ओतल्याने कचरा पडून

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शाहूनगरापासून ते थेट पिंप्राळा रेल्वे गेटपर्यंत लॉकडाऊन काळात तयार करण्यात आलेली गटार येथील लोकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. तीन फूट रुंद, पाच फूट खोल गटारीचे कामच व्यवस्थित झाले नसल्याची प्रतिक्रिया येथील रहिवाशांनी दिली आहे. या गटारींच्या अशास्त्रीय कामामुळेच या गटारीत कचरा अडकून गटारीतून पाण्याचा निचरा न होण्याने पाणी रस्त्यावरून वाहत असल्याची बाब नित्याची झाल्याने येथील रहिवाशांसह व्यावसायिक देखील त्रस्त झाले आहेत.

शाहूनगर ते भोईटेनगर रेल्वे गेटदरम्यान लॉकडाऊन काळात या परिसरात तीन फूट रुंद व पाच फूट खोल गटारी तयार करण्यात आल्या होत्या. या गटारींमुळे आपली पाणी तुंबण्यापासून सुटका होईल, अशी या परिसरातील नागरिकांची भावना होती. मात्र, थोड्याच दिवसांत येथील नागरिकांचा भ्रमनिरास झाला. या गटारींच्या दोन्ही बाजूला भिंती तयार करण्यात आल्या. मात्र, जमिनीलगत काँक्रीट न ओतल्याने ठिकठिकाणी असाऱ्या उघड्या पडून त्यात कचरा अडकून पाण्याचा निचरा न झाल्याने या गटारीचे पाणी रस्त्यावरून वाहत असल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. या गटारींची नियमित साफसफाई केली जात नसल्याने पाणी रस्त्यावरून वहायला लागल्यानंतर पालिकेला जाग येते. त्यानंतर जेसीबीद्वारे येथून तुंबलेल्या कॅरिबॅग, गाळ काढण्यात येतो. हा गाळ देखील जेसीबीने उचलण्यात येत असल्र्याने नागरिकांनी घर, दुकानासमोर स्वखर्चाने टाकलेले ढापे तुटत असल्याचे नागरिकांनी सांगितले.

स्वखर्चाने टाकलेले ढापे तुटतात

गटार शाहूनगरातील हनुमान मंदिरापासून वाहून येत असल्याने या गटारीत मोठ्याप्रमाणात कॅरिबॅग, कचरा व गाळ साचतो. हा गाळ काढण्यासाठी व काढलेला गाळ उचलण्यासाठी जेसीबीचा वापर करण्यात येतो. त्यामुळे गटारीवर स्वखर्चाने टाकलेले ढापे तुटतात. दर दोन-चार दिवसांत ही गटार ओव्हर फ्लो होते. त्यामुळे नियमित गटारी साफ करण्याची गरज आहे, असे जनार्दन भोळे म्हणाले.

पावसाळ्यात होतात अळ्या

जितेंद्र सैंदाणे यांनी सांगितले की, पावसाळ्यात ही गटारी नेहमीच तुंबते. अशा वेळी गटारीतून मोठ्याप्रमाणात अळ्या चालतात. ह्या अळ्या रात्रीतून घरे वा दुकानांपर्यंत येतात. सकाळी दुकानाचे शटर उघडून पाहिले असता. दुकानात ह्या अळ्यांचा मोठ्याप्रमाणात वावर सुरू असतो. तीन फूट रुंद व पाच फूट खोल गटार असूनही अनेकदा ही गटार ओसंडून रस्त्यावरून वाहते. गटारीची नियमित साफसफाई केल्यास येथील रहिवाशांची या पासून सुटका होईल.

बातम्या आणखी आहेत...