आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिळवले यश:गौरव, तेजस, प्रणाली, प्रियंका, स्नेहा, साक्षी ; प्रतिकुल परिस्थितीत झगडत मिळवले यश

जळगाव14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दहावीच्या परीक्षेत अनुकूल परिस्थितीत ९० ते ९५ टक्के गुण मिळवणारे अनेक असतात. मात्र, राेजच राेजीराेटीची प्रश्नाेत्तरे साेडवत काही जण यशाला गवसणी घालतात, तेव्हा त्यांचा सगळ्यांनाच अभिमान वाटताे. शिक्षणाचा महत्वाचा टप्पा पार करताना परिस्थितीशी दोन हात करणाऱ्या गुणवंतांची ही कहाणी..

पैसे नसल्याने सोडणार होता शाळा, मिळवले ८२.२० टक्के

गौरव : समता नगरातील रहिवासी गौरव योगेश सोनवणे या मूकबधिर विद्यार्थ्याने अत्यंत गरिबीच्या परिस्थित शिक्षण घेत यश मिळवले आहे. गौरवने ८२.२० टक्के मिळवले. त्याने श्रवण विकास कर्णबधिर विद्यालयातून प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. वडिलांचा कटिंगचा व्यवसाय आहे. कोरोनामुळे परिस्थिती अत्यंत हलाखीची झाली होती. पैसे नसल्याने शाळा साेडण्याचा विचार त्याच्या मनात आला होता.

वडिलांनी मोलमजुरी केली, मुलाला मिळाले ८०.४० टक्के तेजस : पाळधी येथील रहिवासी असलेला तेजस प्रकाश सोनवणे या मूकबधिर विद्यार्थ्याने आपल्या दिव्यंगत्वावर मात तर केलीच सोबतच आपल्या गरिबीच्या परिस्थितीतून देखील ८०.४० टक्के गुण मिळवत यश मिळविले. तेजसचे वडील कापूस वेचण्याचे व केटरिंग असे मिळेल ते काम करतात. शिक्षणाचा खर्च भागेल इतकी देखील परिस्थिती नसताना तेजसने विशेष प्राविण्यासह यश मिळवले आहे.

वडिलांच्या मृत्युचे दु:ख पचवून मिळवले ८९ टक्के प्रणाली : प.न. लुंकड कन्या शाळेतील विद्यार्थिनी प्रणाली सचिन कोंडाळकर हिने दहावीत ८९ टक्के गुण मिळवले. जून २०२१ मध्ये वडिलांचे निधन झाले अन परिवार खचून गेला होता. मात्र वडिलांची इच्छा होती की मुलीने शिकून मोठे व्हावे याकरिता प्रणालीने दुःख बाजूला सारून अभ्यास करत यश मिळवत वडिलांचे स्वप्न पूर्ण केले.

वडिलांना कर्करोगाचे निदान, घाबरली नाही, धिराने लढली प्रियंका : शहरातील ए.टी. झांबरे विद्यालयातले प्रियंका सुधाकर भारुळे या विद्यार्थीने ९५.४० टक्के गुण मिळविले असून घरात वडिलांना कॅन्सर झालेला असताना देखील तिने हे यश मिळविले आहे. रिक्षा चालक असलेल्या प्रियांकाच्या वडिलांना प्रिलियम सुरु असतानाच अचानक तोंडाचा कॅन्सर असल्याचे निष्पन्न झाले. परिस्थिती साधारण असतानाच इतका मोठा आजार झाल्याने सर्वच हादरले होते. मात्र प्रियंकाने वडिलांच्या उपचारासाठी शिकून मोठे होऊन पैसे कमवावे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून अभ्यास करत यश मिळविले. हात काम करेना, वेदना सहन करून मिळवले ९२ टक्के स्नेहा : जळगाव शहरातील स्नेहा जाधव या विद्यार्थिनीला खांद्यापासून हातापर्यंतच्या नसा अचानक चोकअप झाल्या आणि ऐन दहावीच्या महत्वाच्या वर्षातच लिहिण्याची समस्या निर्माण झाली. अभ्यासात अत्यंत हुशार असलेल्या स्नेहाला काय करावे कळतच नव्हते; यातच तिने जिद्दीने परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. अनेक तास अभ्यास देखील केला. लिहिता येत नसतानाही हाताचा त्रास सहन करून स्नेहाने परीक्षेत तब्बल ९२ टक्के गुण मिळवत घवघवीत यश मिळवले. या यशाबद्दल तिचे पालक व शिक्षकांनी कौतुक होत आहे.

कोरोनाने वडिलांना नेले, खचली पण हरली नाही साक्षी : आहुजानगरातील साक्षी ज्ञानेश्वर सुरवाडे या विद्यार्थिनीने कोरोनाने वडिलांचे निधन झाल्यानंतर देखील दहावीच्या परीक्षेत ५३.४० टक्के गुण मिळवत यश मिळवले आहे. १ मे २०२१ रोजी तिच्या वडिलांचे कोरोनाने निधन झाले अन मुलींच्या डोक्यावरचे छत्र हरपले. बहीण बारावीला आणि साक्षी दहावीला होती. त्या खचल्या पण हरल्या नाहीत.

बातम्या आणखी आहेत...