आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकीय:संकटमोचकांनी प्रचार केलेल्या बेळगावातील उमेदवारांपैकी निम्मेच विजयी; मंत्री महाजन म्हणाले, बऱ्याच वर्षांनी काँग्रेसला विजय मिळाला...

जळगाव15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्याचे ग्रामविकासमंत्री भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांनी कर्नाटक विधानसभा निवडणुकीत बेळगावातील दहा उमेदवारांचा प्रचार केला. त्यापैकी सात उमेदवार निवडणूक येणे अपेक्षित असताना पाचच उमेदवार निवडून आले. आम्ही कर्नाटकात कमी पडल्याचे मंत्री महाजन यांनी सांगितले. बेळगावात मंत्री महाजनांनी प्रचार केलेल्या कोणत्या जागा निवडून आल्या, हे मात्र त्यांनी सांगितले नाही.

जिल्हा दूध संघात एका उद्घाटन समारंभानिमित्त मंत्री महाजन आले होते. त्यावेळी कर्नाटक निकालावर पत्रकारांशी बोलताना महाजन म्हणाले कर्नाटक निकालात काँग्रेसने मुसंडी मारलेली आहे. बहुमताने सत्तेत आली. आम्हाला अपेक्षेप्रमाणे यश मिळाले नाही. आम्ही तेथे कमी पडलो. त्या संदर्भात राज्य भाजप, केंद्रीय नेते मंथन करतील. आत्मपरीक्षण असे म्हणता येणार नाही. अॅन्टी इन्कबन्सीमुळे आम्ही तेथे हरलो आहोत. कर्नाटकात व्देषाचे दुकान बंद झाले, प्रेमाचे दुकान सुरु झाल्याच्या राहुल गांधी यांच्या विधानावर मंत्री महाजन म्हणाले, एखाद्या राज्यात काँग्रेस जिंकली आहे. उत्तर प्रदेशात तुमचे प्रेम का उतू आले नाही. बऱ्याच वर्षांनी काँग्रेसला विजय मिळालेला आहे.

राऊत बेगाने शादी मे अब्दुल्ला दिवाना....

संजय राऊत यांनी बजरंगबलीची गदा भाजपच्या डोक्यावर पडली असे विधान केल्याबाबत पत्रकारांनी त्यांना विचारले. त्यावर राऊतांनी राज्यात काहीतरी करुन दाखवावे. तुम्ही कुठे आहात, भविष्यात कोठे रहाल, याचा शोध त्यांनी घ्यावा. उगाच तोंडसुख घेत आहेत. बेगाने शादीमे अब्दुल्ला दिवाना, शेजाऱ्याला मुलगा झाला म्हणून पेढे वाटायचे, तुमच्या घरात काय आहे. तुम्ही तर वांझोटे आहात, तिकडे लक्ष घालावे,अशी टीका मंत्री महाजनांनी केली.

खडसे पोकलॅनवर चढून नाचल्याची कमालच वाटली...

महागाई, भ्रष्टाचाराच्या विरोधात कर्नाटकच्या जनतेने कौल दिला असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी दिली. त्यावरही महाजनांनी प्रत्युत्तर दिले. खडसे यांनी मुक्ताईनगरमध्ये बघावे.बाजार समिती निवडणूक जिंकली तर पोकलॅनवर मिरवणुक काढतात. राज्यस्तरीय नेता बाजार समिती निवडणूक जिंकल्यानंतर पोकलॅनवर लावून नाचला. मला तर कमालच वाटली. तुम्ही तुमच्या मतदार संघापुरते बघा, असा सल्ला त्यांनी खडसे यांना दिला.