आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:जळगावात सोने खरेदी, पेमेंटसाठी पहिल्यांदाच रांगा, एकाच दिवसांत सुमारे 60 किलाे साेने विक्रीचा नवा विक्रम

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दसऱ्याला कुटुंबीयांसाठी साेने खरेदी करून देऊन आनंद लुटण्याची मजा बुधवारी सुवर्णनगरीतील शेकडाे ग्राहकांनी लुटली. त्यामुळे सराफा व्यावसायिकांच्या अपेक्षेपेक्षाही १० किलाे अधिक म्हणजे सुमारे ६० किलाे साेने एकाच दिवसात विक्रीचा नवा विक्रमी आकडा पुढे आला. सकाळी ८.३० वाजेपासून साेन्याची शाेरूम गजबजायला सुरुवात झाली. जळगावात बुधवारची सकाळ ‘सुवर्ण बाजारपेठे’साठी साेनेरी ठरली. नेहमीच्या वेळेच्या ( सकाळी ९) एक तास अगाेदर सकाळी ८ वाजेपासून सुवर्णपेढ्या व शाेरूमची दालने ग्राहकांसाठी खुली झाली. त्याला ग्राहकांकडूनही प्रतिसाद लाभला. सकाळी १०.३० वाजेपासून शहरातील माेठ्या शाेरूममध्ये हाऊस फुल्ल झाल्याचे चित्र बघायला मिळू लागले. दसऱ्याच्या मुहूर्ताची खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी माेठ्या प्रमाणावर गर्दी केली. मुहूर्ताच्या खरेदीत केल्या जाणाऱ्या तुकडा, लड व शिक्क्यांएेवजी तयार दागिने घेण्याकडे कल गेल्या काही वर्षांत वाढला आहे. यंदा गेल्या वर्षीपेक्षा किमान २५ टक्के ग्राहकांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे अपेक्षेपेक्षा जास्त विक्रीही वाढल्याचे महावीर ज्वेलर्सचे जनसंपर्क अधिकारी मनाेहर पाटील यांनी सांगितले.

पेमेंटसाठी पाहावी लागत हाेती वाट : दागिन्यांची खरेदी केल्यानंतर पेमेंटसाठी काउंटवरही ग्राहकांची गर्दी झाली हाेती. पेमेंट करण्यासाठी ग्राहकांना अगाेदर रांगेत उभ्या असलेल्या २० ते २२ जणांना पेमेंट केल्यानंतर नंबर लागत असल्याचे चित्र दिसून आले.

अंगठी, कानातील दागिने खरेदीला अधिक गर्दी दसऱ्याला नेकलेस, नव्या डिझाइनच्या बांगड्या, पाटल्या, अंगठी, कानातील या दागिन्यांना अधिक मागणी असल्याने शाेरूममध्ये या दाेन विभागात अधिक गर्दी झाली हाेती. त्यामुळे ग्राहकांना खरेदीसाठी ग्राहकांना प्रतीक्षा करावी लागली.

१००० दुचाकी, ३०० कार, २०० ट्रॅक्टर रस्त्यावर दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर बुधवारी ऑटाेमाेबाईल क्षेत्रात झळाळी आली हाेती. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा वाहनांच्या विक्रीत वाढ झाल्याचा दावा करण्यात आला आहे. जिल्हाभरात एक हजारापेक्षा जास्त दुचाकी व ३०० चारचाकींची विक्री झाली. तसेच २०० ट्रॅक्टर शेतकऱ्यांच्या घरासमाेर लागले असून दिवसभरात ३० ट्रॅकची विक्री झाली आहे. तर दसऱ्याला सुमारे २५० जणांनी नवीन घरात गृह प्रवेश केला आहे.

बातम्या आणखी आहेत...