आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अधिसभेच्या नोंदणीकृत पदवीधरांच्या दहा जागांच्या निवडणुकीसंदर्भात विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांच्या अध्यक्षतेखाली विविध पदवीधर विद्यार्थी संघटनांचे प्रतिनिधी तसेच इतर शिक्षणप्रेमी नागरिक यांच्यासमवेत बुधवारी सहविचार सभा झाली. यात पदवीधराला नूतनीकरणासाठी लागणारे शुल्क घेऊ नये तसेच कमीत कमी डॉक्युमेंट ऑनलाइन अपलोड करण्यासह विविध मागण्या संघटनांनी केल्या.
सभेच्या प्रारंभी निवडणूक कक्षाचे विभाग प्रमुख डॉ. एस. आर. भादलीकर यांनी पदवीधर नोंदणीची सविस्तर माहिती दिली. यापूर्वीच्या मतदारांना मतदार नोंदणीचे नूतनीकरण करावे लागेल. तसेच नवीन पदवीधरांना मतदार नोंदणी करावी लागेल. त्यासाठी अर्ज ऑनलाइन उपलब्ध करून दिला जाईल. मतदार नोंदणीसाठी कोण पात्र आहेत याची सविस्तर माहिती त्यांनी दिली. यावेळी उपस्थित प्रतिनिधींनी काही सूचना केल्या. त्यामध्ये नोंदणी प्रक्रिया ऑफलाइन देखील ठेवावी या व इतर काही सूचना केल्या.
अध्यक्षीय समारोपात कुलगुरू प्रा.व्ही.एल. माहेश्वरी यांनी विद्यापीठाची अधिसभा हे सर्वोच्च अधिकार मंडळ आहेत. यातूनच नेतृत्वाची प्रक्रिया घडते असे सांगून ही संपूर्ण प्रक्रिया विद्यापीठाकडून पारदर्शकपणे राबवली जाईल असे सांगितले. दरम्यान, विद्यार्थी संघटनांनी केलेल्या शुल्काबाबतच्या मागणीला कुलगुरूंनी सकारात्मक दृष्टिकोनाने विद्यार्थी हिताचा निर्णय घेण्याचे सहविचार सभेत आश्वासन केले. व्यासपीठावर विद्यापीठाचे प्रभारी प्र-कुलगुरू प्रा. एस.टी. इंगळे, प्रभारी कुलसचिव प्रा. के. एफ. पवार हे उपस्थित होते. जनसंपर्क अधिकारी डॉ. सुनील पाटील यांनी सूत्रसंचालन केले.
विद्यापीठ परिसरामध्ये स्वतंत्र कॅश काउंटरसह संघटनेने केल्या विविध मागण्या पदवीधर मतदारसंघात नाव नोंदणी करताना सन २०१७ च्या मतदार यादीत ज्यांचे नावे आहे त्यांना पुनश्च नाव नोंदणी करताना नोंदणी शुल्क आकारण्यात येऊ नये. त्यांचे फॉर्म फक्त ऑनलाइन भरण्यात यावे, हार्ड कॉपी जमा करण्याची सक्ती नसावी.
महिलांना नाव नोंदणी करताना पदवी प्रमाणपत्रावरील नाव व ओळखपत्रावरील नाव यात बदल असल्यास स्वयंघोषणापत्र मतदार यादीत नाव नोंदणी करताना ऑनलाइन फॉर्म सोबत उपलब्ध करून देण्यात यावे.
मतदार यादीत नाव नोंदवताना जे मतदान केंद्र निवडले असेल तेच मतदान केंद्र मतदाराला देण्यात आले आहे याची खातरजमा मतदार यादी जाहीर करण्यापूर्वी करण्यात यावी. तसेच मतदार काही कारणाने मतदान केंद्रावर पोहोचू न शकल्यास त्याला जवळच्या इतर कुठल्याही मतदान केंद्रावर मतदान करण्याची सुविधा उपलब्ध व्हावी. निवडणूक प्रक्रिया सुलभ व सहज होण्यासाठी मतदार नाव नोंदणी, मतदान प्रक्रिया व मतमोजणी या विषयात प्रशिक्षण देण्यात यावे. ऑनलाइन अर्ज भरताना आधार क्रमांक व पदवी कोडच आवश्यक असावा, विद्यापीठ परिसरात स्वतंत्र कॅश काउंटर सुरू करण्यात यावे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.