आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वादळी वार्‍यात केळीच्या बागा उद्ध्वस्त:पालकमंत्री गुलाबराव पाटील थेट बांधावर, नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्याचे आदेश

जळगाव23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव तालुक्यातील भोकर आणि पिंप्राळा महसूल मंडळातील 21 गावांना वादळी वारे व पावसाचा फटका बसला आहे. या परिसरातील 2091 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीची रविवारी दुपारी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी थेट बांधावर जाऊन पाहणी केली. यावेळी व्यथा-वेदना सांगतांना शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले. याप्रसंगी पालकमंत्र्यांनी प्रशासनाला तातडीने नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्याचे आदेश दिले.

भोकरसह परिसरातील गावांना वादळी पावसाने फटका दिला. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी गाढोदा, भादली खुर्द, भोकर, पळसोद शिवार, कठोरा, करंज, घार्डी, नांद्रा बुद्रुक नंदगाव आदींसह परिसरातील शिवारात थेट बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली. याप्रसंगी त्यांच्या सोबत प्रांताधिकारी सुधळकर, तहसीलदार नामदेव पाटील, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, पोलीस निरिक्षक रामकृष्ण कुंभार, तालुका कृषी अधिकारी एस. जे. राऊत, मंडळ कृषी अधिकारी एम. जी. जंगले, कृषी सहायिका अनिता जाधव, शिवसेनेचे तालुका प्रमुख राजेंद्र चव्हाण, डॉ. कमलाकर पाटील, कृषी तक्रार निवारण समिती सदस्य डॉ. सत्वशील पाटील, माजी सभापती भरत बोरसे, उपतालुका प्रमुख प्रमोद सोनवणे, योगेश लाठी यांच्यासह शेतकरी उपस्थित हाेते.

केळीचे नुकसान जास्त

भोकर महसूल मंडळातील 2151 शेतकऱ्यांचे 2037 हेक्टर क्षेत्रातील केळीचे नुकसान झाले. तर पिंप्राळा महसूल मंडळातील 65 शेतकऱ्यांचे 54 हेक्टर असे एकूण 2216 शेतकऱ्यांचे 2091 हेक्टर क्षेत्रफळाचे नुकसान झाले आहे. पालकमंत्र्यांनी तातडीने सरसकट पंचनामे करण्याचे निर्देश दिले. तसेच जिल्हाधिकारी आणि विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींसह बैठक घेऊन तातडीने नुकसान भरपाई मिळवून देण्याची ग्वाही देखील त्यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...