आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाट्यमय घडामाेडी:सभा राेखण्यात पालकमंत्री गुलाबरावांची सरशी; पण ऑनलाइन विचार पाेहाेचवण्यात सुषमा अंधारे यशस्वी

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातर्फे शुक्रवारी मुक्ताईनगर येथे आयाेजित व जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी घातलेल्या सभेला शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांना पाेलिसांच्या माध्यमातून राेखून पालकमंत्री गुलाबराव पाटील जिंकले; पण वृत्तवाहिन्या, युट्यूब चॅनल व फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून तब्बल साडेपाच तास आॅनलाइन राहील्या. इतकेत नव्हे तर त्यांना जे विचार लाेकांपर्यंत पाेहाेचवायचे हाेते त्यात सुषमा अंधारे या यशस्वी ठरल्या.

ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे या महाप्रबाेधन यात्रेच्या माध्यमातून बुधवारपासून जिल्ह्यात आलेल्या आहेत. यात्रेदरम्यान त्यांच्या धरणगाव, पाराेळा, पाचाेरा व चाेपडा या चार तालुक्यात जाहिर सभा झाल्या. तर शुक्रवारी मुक्ताईनगर येथे शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हाेमपीचवर त्यांची जाहीर सभा हाेणार हाेती. मात्र, जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी गुरुवारीच या सभा घेण्यास कायदा व सुव्यवस्थेचे कारण देत परवानगी रद्द केली हाेती. जळगावातील खासगी हाॅटेलमध्ये मुक्कामाला असलेल्या उपनेत्या अंधारे यांनी संपर्क प्रमुख संजय सावंत व इतर स्थानिक पदाधिकाऱ्यांसाेबत जावून जिल्हाधिकारी व पाेलिस अधिक्षक यांच्यासाेबत तीन वेळा बैठका घेवून सभा घेवू देण्याबाबत आपली बाजू मांडली. संध्याकाळी पाच वाजेपासून साध्या गणवेशातील महिला पाेलिस हाॅटेलच्या प्रत्येक मजल्यावर व अंधारे यांच्या रुमबाहेर थांबून हाेत्या.

संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास संपर्कप्रमुख सावंत, उपनेत्या अंधारे उपस्थित शिवसैनिकांसह हाॅटेल बाहेर येवून सभेकडे जाण्यास निघाले असताना पाेलिस कर्मचाऱ्यांनी त्यांना जाण्यास मज्जाव केला. या वेळी शिवसैनिकांनी त्यांना आदेशाची मागणी केली. यावर पीआय ठाकूरवाड येत असल्याचे सांगून अर्धा तास अंधारे यांना राेखून ठेवले. सावंत यांनी त्यांना कारमध्ये जावून बसण्यास सांगितले. या वेळी खुबचंद साहित्या हे ड्रायव्हींग सीटवर बसले हाेते. सुमारे अर्धा तासाने पाेलिस निरीक्षक ठाकुरवाड, एलसीबीचे निरीक्षक किसन नजन पाटल, हाेम डीवायएसपी संदीप गावीत आले. दरम्यान, पाेलिसांनी आपल्याला पाच तास नजरकैदेत ठेवल्याचा आराेपही अंधारे यांनी केला.

पाेलिसांचा चूक सुधारण्याचा प्रयत्न : युवासेनेचे विस्तारक शरद काेळी हे गुरुवारी पाेलिसांतील विसंवादामुळे पाेलिसांच्या हातावर तुरी देवून पसार झाले आहेत. ही चूक सुधारण्यात पाेलिस यंत्रणा शुक्रवारी यशस्वी ठरली. तिन्ही वरीष्ठ अधिकारी आल्यानंतर अंधारे या गुंगारा देवून वाहनाने निघून जावू नये म्हणून पाेलिसांनी आपली वाहने हाॅटेलकडून बाहेर पडण्याचा मार्ग राेखला जाईल या पद्धतीने उभी करून नाकाबंदी केली.

गुलाबराव पाटलांनी सत्तेचा गैरवापर केला : सुषमा अंधारे सभांमध्ये प्रश्न विचारल्यावर दमण यंत्रणा वापरली. मला नजरकैदेत ठेवले. गुन्हा सांगितला नाही. आरोप नसताही नजरकैदेत ठेवले जातेय. आवाज बंद करताहेत. माझी सभा होवू दिली नाही म्हणून काय फरक पडतोय. इथे हजारो लोक लाइव्ह बघताहेत. मी ऑनलाइन सभा घेऊन जिंकले. मी जिंकले देवेंद्रजी. भिडे, गायकवाड, राणे, बांगर यांच्याविषयी ममत्वभाव का? मिंधे गटाचे संरक्षण करण्यासाठी मंत्री झाला नाहीत? माझ्याविषयी आकसभाव का? अशा शब्दात शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. महाप्रबोधन यात्रा सुरुच राहणार असल्याचे सांगत आमदार चंद्रकांत पाटील यांचा हिशोब पुढच्या वेळेस चुकता केला जाईल, असेही सांगितले. महाप्रबोधन यात्रेच्या निमित्ताने ज्या सभा पार पडल्या, या सभांमध्ये माझा एकही शब्द असंसदीय नाही. कुणाचाही ऐकरी उल्लेख, उपमर्द केला नाही. तरी सुध्दा माझ्या सभांवर बंदी का यावी? ही ऑनलाइन सभा समजा. ही सभा गनिमी काव्याने करणे भाग आहे. माझ्या भाषणाने दंगल झाली नाही. भाषण न होवू देण्याची कुणी मागणीही केली नाही. तरी सुद्धा गुलाबराव पाटील यांनी सत्तेचा गैरवापर केला अशी टीका अंधारे यांनी आॅनलाइन सभेतून केली.

वरिष्ठ नेते संपर्कात पाेलिसांनी महिला पाेलिसांना गाडीच्या पुढे उभे करून मज्जाव केल्याने शिवसैनिकांवर गुन्हे दाखल हाेण्याची शक्यता व्यक्त करत अखेर आठ वाजेच्या सुमारास सावंत यांनी उपनेत्या अंधारे या सभास्थळी न जाता आॅनलाइन सभा घेतील असे जाहीर केले. त्यानंतर शिवसेनेचे सर्व नेते व पदाधिकारी पुन्हा हाॅटेलमध्ये तिसऱ्या मजल्यावर गेले. जिल्ह्यात अंधारे यांनी घेतलेल्या चार सभेत सर्वाधिक सव्वा तास भाषण करून विराेधकांना कात्रीत पकडले. शुक्रवारी शेवटची पाचवी सभा घेण्यापासून त्यांना राेखले; पण संध्याकाळी पाच वाजेपासून त्या वृत्तवाहिन्या, युट्यूब चॅनल, लाइव्ह, मुलाखती, फेसबूक पेजवर लाइव्ह सभा असे साडेपाच तास भाषण, टिका, विराेधकांना प्रश्न विचारून अधिक चर्चेत राहील्या. अंधारे यांना सभा घेण्यापासून राेखण्यावर उद्धव ठाकरे गटाच्या सर्वाचेच लक्ष हाेते. अंधारे यांच्यांशी संध्याकाळपासून पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, नेते आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे, नीलम गाेरे, सचिन आहेर, विनायक राऊत आदींनी फाेन करून विचारपूस करून मार्गदर्शन केले. आदित्य ठाकरेंनी तीन वेळा अंधारे यांच्याशी संवाद साधला.

अंधारे लाइव्ह येताच मुक्ताईनगरात ३०० कार्यकर्त्यांना पाठवली लिंक मुक्ताईनगर | पोलिसांनी सुषमा अंधारे यांच्या मुक्ताईनगरातील सभेला परवानगी नाकारली. यानंतर नाट्यमय घडामोडी घडल्या. मात्र, रात्री साडेनऊला त्या महाप्रबोधन यात्रेच्या फेसबुक पेजवर लाइव्ह आल्या. यानंतर पदाधिकाऱ्यांनी मुक्ताईनगर शहर व तालुक्यात ३०० जणांना लिंक पाठवली. त्यावरून सुमारे एक हजार लोकांनी ठिकठिकाणी सभा ऐकल्याचा दावा पदाधिकाऱ्यांनी केला. दरम्यान, परवानगी नाकारून देखील गोदावरी मंगल कार्यालयात सभेची तयारी करणाऱ्या ठाकरे गटातील ९ पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी सायंकाळी ५ वाजता ताब्यात घेऊन सोडले. यानंतर सर्वांनी जळगाव गाठले. यामुळे शहरातील राजकीय धुराळा काहीसा खाली बसला. मात्र, सुषमा अंधारे सोशल मीडियावरूनच बोलणार असल्याचे निरोप धडकताच पदाधिकारी कामाला लागले.

सुषमा अंधारेंच्या दिवसभराच्या घडामाेडी { सुषमा अंधारे या के.पी. प्राइड हॉटेलमध्ये मुक्कामी होत्या. शुक्रवारी दुपारी १२.१५ वाजता त्या शहरातील एका कार्यक्रमाला गेलेल्या होत्या. दुपारी ३ वाजता त्या हॉटेलमध्ये परतल्या. { सायंकाळी ४ वाजेपासून हॉटेल व परिसरात पोलिस बंदोबस्त लावण्यात आला. निवासाची व्यवस्था करण्यात आलेल्या खोलीतून अंधारे यूट्यूब चॅनल, राष्ट्रीय, प्रादेशिक माध्यम प्रतिनिधींना प्रतिक्रिया देत होत्या. { चॅनलच्या स्टुडिअोतून त्यांचे थेट लाइव्ह प्रक्षेपण सुरु होते. युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे, खासदार विनायक राऊत, सचिन अहिर या नेत्यांचे त्यांना फोन येवून गेले. प्रसार माध्यमे व शिवसेना नेत्यांशी बोलण्यात त्या व्यस्त होत्या. { मुक्ताईनगरच्या सभेला जाण्यासाठी ६. ५८ वाजता त्या जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत व पदाधिकाऱ्यांसह हॉटेलबाहेर आल्या. ६.५९ वाजता त्यांनी हॉटेलबाहेरील पायऱ्यांवर माध्यम प्रतिनिधींना प्रतिक्रिया दिली. { ७ वाजून १२ मिनिटांनी त्या मुक्ताईनगरला जाण्यासाठी त्यांच्या वाहनात बसल्या. महिला पोलिसांनी त्यांचे वाहन अडवले. ७ वाजून ३२ मिनिटांनी त्या वाहनातून खाली आल्या. त्यानंतर पुन्हा ७ वाजून ३५ मिनिटांनी त्यांनी हॉटेलच्या पायऱ्यांवरुन पुन्हा माध्यमांशी संवाद साधला. { रात्री ८ वाजता ऑनलाइन सभा घेणार असल्याचे सांगून त्या पुन्हा हॉटेलमधील खोलीत परतल्या. त्यानंतर त्यांनी महाप्रबोधन यात्रेच्या फेसबुक पेजवरुन ९.३० वाजता ऑनलाइन सभा घेतली. त्यांचे भाषण २.६ के. नागरिकांनी लाइक केले. ५९६ प्रतिक्रिया तर २८० लोकांनी भाषणाचा व्हिडिओ शेअर केला.

बातम्या आणखी आहेत...