आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुलाबराव पाटलांनी दिला जय जवान-जय किसानचा नारा:विज्ञानाच्या भरभराटीसाठी सर्वांनी प्रयत्नशील राहण्याचे प्रतिपादन

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

विज्ञान प्रदर्शन हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना दिशा देणारे एक व्यासपीठ आहे. त्याचा उपयोग करुन विद्यार्थ्यांनी देश व राज्य पातळीवर आपल्या शाळेचे नाव उंचवावे. विज्ञान, तंत्रज्ञान आयुष्याचा अविभाज्य भाग असून सर्वांनी विज्ञानाची कास धरावी. जय जवान, जय किसान व जय विज्ञानाच्या भरभराटीसाठी सर्वांनीच प्रयत्नशील रहावे, असे प्रतिपादन पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

शिक्षण विभाग व जीपीएस कॅम्पस पाळधी यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले. मंत्री पाटील यांच्यासह मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या उपकरणांची पाहणी करून शिक्षक व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.तालुक्यातील जि. प. शाळा निंभोरा येथील शाळेचा नवोदय मध्ये विशेष प्रावीण्य प्राप्त केल्याबद्दल मुख्याध्यापकांसह शिक्षकांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

विज्ञान प्रदर्शन उपयुक्त ठरेल

माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ.नितीन बच्छाव यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले, आजचे जग विज्ञान शिक्षणावर आधारित आहे. ग्रामीण भागात बुद्धिमत्ता आहे. तिला योग्य वळण देण्यासाठी शिक्षकांनी आपले ज्ञान अद्ययावत ठेवून मुलांचे दीपस्तंभ व्हावे. तर प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील म्हणाले, विद्यार्थी सक्षम होण्यासाठी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन उपयुक्त ठरत असते.

49 वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन

विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन जास्तीत जास्त वाढी साठी शिक्षकांनी सजग रहावे असे आवाहनही त्यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गट शिक्षणाधिकारी रविकिरण बिऱ्हाडे यांनी केले. शिक्षण विभाग पंचायत समिती धरणगाव व भाऊसाहेब गुलाबराव पाटील स्कूल कॅम्पस पाळधी यांच्या संयुक्त विद्यमाने 49 वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन पाळधीच्या जीपीएस कॅम्पस येथे आयोजित करण्यात आले होते.

यांनी केले परिक्षण

या प्रदर्शनात 123 शाळांनी सहभाग नोंदवून, विद्यार्थ्यांनी आपल्या विविध प्रकल्पांचे यशस्वी सादरीकरण केले. सदर कार्यक्रमाला संपूर्ण तालुक्याभरातून विविध शाळांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लावली. विज्ञान प्रदर्शनाचे परीक्षणाचे कार्य डी. ए. धनगर, संजय पाटील, आर. सी. कोळी, वंजारी यांनी केले.

अयान खाटीकच्या बायोक्लॉकला प्रथम क्रमांक

या विज्ञान प्रदर्शनात इयत्ता सहावी ते आठवी या उच्च प्राथमिक गटात गुड शेफर्ड स्कूल धरणगावच्या विद्यार्थ्याचा बायोक्लॉक उपकरणाला प्रथम क्रमांक मिळाला. द्वितीय क्रमांक अंकिता ज्ञानेश्वर बोरसे- (जि प उच्च प्राथमिक शाळा निंभोरा, स्मार्ट हेल्मेट उपकरण) तर तृतीय क्रमांक राज गुलाब पाटील (माध्यमिक विद्यालय भोणे, गणितीय खेळणे ) या विद्यार्थ्याला मिळाला. एक दिवसीय विज्ञान प्रदर्शनात उच्च प्राथमिक 52 व 38 माध्यमिक व उच्च माध्यमिक गटात विद्यार्थ्यांनी उपकरणांची मांडणी केली होती.

यांची उपस्थिती

उद्घाटन समारंभास जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षण अधिकारी डॉ. नितीन बच्छाव, प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील, डायटचे प्राचार्य डॉ. अनिल झोपे , धरणगाव गटविकास अधिकारी सुशांत पाटील, जीपीसचे कार्यकारी संचालक तथा तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील, गट शिक्षणाधिकारी रविकिरण बिऱ्हाडे आदी मान्यवर उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...