आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिवसेनेला विधानसभेच्या ४० जागा देऊन भाजप १४४ जागांवर निवडणूक लढवेल, असे वक्तव्य करून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिंदेच्या शिवसेनेला दुखावले आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांच्याशी आगामी निवडणुकीतील जागावाटप आणि मुदतपूर्व निवडणुकीच्या मुद्दयांवर केलेल्या चर्चेचा गोषवारा.
प्रश्न - भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेनेला विधानसभेच्या फक्त ४० जागाच देणार असल्याचे सांगितले आहे. त्यावर शिवसेना समाधानी आहे?
उत्तर - भाजप प्रदेशाध्यक्षांचे म्हणणे चुकीचे आहे. ज्या लोकांनी राजकीय आयुष्याचा सट्टा लावला, कठोर टीका सहन केली, ज्यांनी राजकीय आयुष्य पणाला लावले त्यांच्या बाबतीत असे बोलणे ही त्यांची थट्टा करणेच आहे. प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचे बोलणे म्हणजेच भाजपची अंतिम भूमिका आहे, असे आम्ही मानत नाही. पक्ष म्हणून मत मांडण्याचा त्यांचा अधिकार असला तरी त्यांनी आमच्या पक्षाच्या आणि लोकांच्या बाबतीत असे बोलणे उचित नाही, अशा आमच्या भावना आहेत.
प्रश्न - शिवसेनेला विधानसभेसाठी नेमक्या किती जागा अपेक्षित आहेत?
उत्तर -. भाजपसोबत युतीत लढायचे तर राज्यात शिवसेनेला १०० पेक्षा जास्त जागांची
अपेक्षा असेल. उर्वरित जागा भाजपने किती लढवायच्या आणि मित्रपक्षांना किती द्यायच्या. हा वेगळा विषय असेल,
प्रश्न - सध्या तुमचे ४० आमदार आहेत. त्या पार्श्वभूमीवर १०० जागा ही अव्यवहार्य मागणी आहे, असे नाही वाटत?
उत्तर - नाही. सध्या आमच्याकडे शिवसेना व अपक्ष मिळून ५० आमदार आहेतच. याशिवाय ३० ते ३५ माजी आमदारही सोबत आलेत. अनेक वर्षे राबलेले शिवसैनिक आहेत. त्यामुळे विधानसभेला शंभर जणांना उमेदवारी मिळणे हा काही आमच्यासाठी मोठा आकडा मुळीच नाही. त्यात अव्यवहार्य असेही काहीच नाही. शिवसेनेला मानणारा मतदार राज्यभर आहे.
प्रश्न - भारतीय जनता पक्षाने लोकसभेसोबत विधानसभेची निवडणूक घेतल्यास शिवसेनेला ते मान्य असेल का ?
उत्तर - भाजप आणि शिवसेना यांनी युती केल्यामुळे एकत्रितरीत्या निर्णय घेतले जातील आणि ते दोन्ही पक्षातील सर्वांनाच मान्य करावे लागतील. दोन्ही पक्ष राज्यातील परिस्थिती, लोकांची भावना, कार्यकत्यांची मते जाणून घेतील व त्यानंतरच निर्णय होईल. जो निर्णय होईल तो दोन्ही पक्षांच्या हिताचा असेल एवढे मात्र खरे. त्या संदर्भात अजून काहीही ठरलेले नाही हे मात्र नक्की.
प्रश्न - शिवसेना पक्षात फूट पडण्याआधी ज्या भाजपवर तुम्ही टीका करीत होते त्यांच्यासोबत आता जाणे अडचणीचे ठरेल असे वाटत नाही का?
उत्तर - त्या वेळी भाजपशी खटके उडाले आहेत आणि मीही टीका केली आहे हे खरे आहे. त्या वेळी पक्षाच्या त्या वेळच्या भूमिकेमुळे प्रेरित होऊन बोलत होतो. नंतर शिवसेना म्हणून आमची भूमिका कशी चुकीचे आहे याचे फीडबॅक लोकांकडून आले. आम्ही उद्धवजींनाही ती बाब सांगितली. त्यांनी चूक दुरुस्त करायला नकार दिला. आम्ही ती चूक दुरुस्त केली आहे आणि लोकांना ते आवडले आहे.
प्रश्न - उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे विधिमंडळ सभागृहातून एकत्र बाहेर हसत आले. त्यानंतर दोन्ही नेते एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली आहे. मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तर थेट उद्धव ठाकरे यांना साद घातली आहे. याकडे कसे पाहता ?
उत्तर - विधानभवनात कोण कोणासोबत कसा येईल हे सांगता येत नाही. एका गेटमधून कोणीही सोबत येऊ शकतो. त्यात फार काही महत्त्वाचे नसते, तरीही उद्धव ठाकरे व भाजप एकत्र आल्यास तो त्यांचा वैयक्तिक विषय आहे. त्यावर आपण काय बोलणार?
प्रश्न - तुमच्या खात्याच्या कामाबाबत तुम्ही समाधानी आहात का? किती टक्के ?
उत्तर - नक्कीच. ८० टक्के समाधान तर आहेच. ज्या गावात ५० घरे आहेत तिथेही नळाद्वारे पाणी पोहोचवण्यासाठी आम्ही काम करतो आहोत. ग्रामीण भागात 'सोलार एनर्जी चा उपयोग करून पाणीपुरवठा करण्याचेही नियोजन आणि काम सुरू आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.