आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुसरे काही भांडवल नाही का?:कोण कुणाला, काय म्हणाले? या पलिकडेही महाराष्ट्राचे प्रश्न आहेत; मंत्री गुलाबराव पाटील संतापले

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

''चॅनल सुरु केले की कोण कुणाला काय बोलले, त्यावर कुणी काय प्रतिक्रिया दिली. या पलिकडे काही दिसत नाही. दाखवणाऱ्याला काही वाईट वाटत नाही, बोलणाऱ्यालाही काही वाईट वाटत नाही असा प्रकार झाला आहे. आम्ही या कारणास्तव वृत्तवाहिन्या बघणेच बंद केले. त्या पलिकडेही महाराष्ट्राचे प्रश्न आहेत.ते प्रश्न विचारा,अशा शब्दात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी संताप व्यक्त केला.

जळगावात एका कार्यक्रमानिमित्त पालकमंत्री पाटील आले असताना वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींनी त्यांना राजकीय प्रश्न विचारयला सुरुवात केली. त्यावेळी त्यांनी ही प्रतिक्रीया दिली.

प्रश्न विचारताच संतापले

उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत शिंदे गटाच्या नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विधानावरुन सर्व गदारोळ झाला असल्याचा प्रश्न एका वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीने पाटील यांना विचारला. त्यानंतर ते वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींवर संतापले.

मी चंद्रकांत पाटील यांचे विधान ऐकलेले नाही. रोज रोज मंत्र्यांवर आरोप करण्याशिवाय यांच्याकडे दुसरे भांडवल काही नाही. महाराष्ट्रासाठी काय केले पाहिजेत. टीव्हीवर दुसरे काय आहे? महाराष्ट्राच्या जनतेसाठी काय केले पाहिजेत. कोणत्या योजना, कोणत्या घटकासाठी राबवल्या पाहिजेत. असा कधी प्रश्न तुम्ही विचारला नाही. वृत्तवाहिन्या बघणे मुश्कील होवून गेले आहे.

दुसऱ्या एका प्रतिनिधीने बाळासाहेब ठाकरेंचा अपमान हा शब्द उच्चारताच दुसरे काय आहे? टीव्हीवर काय आहे? शेतकऱ्यांवर गारपीट, हवामानाचा अंदाज आहे. पंजाबराव डख काय बोलतात हे उद्धव ठाकरेंना विचारा. पुन्हा शेतकऱ्यांच्या बांधावर कोण जातेय हे विचारा. उठसूठ हे धंदे असे मंत्री पाटील म्हणाले. आपल्या वेगळ्या शैलीसाठी प्रसिध्द असलेले गुलाबराव माध्यम प्रतिनिधींवर दुसऱ्यांदा संतापले. महाराष्ट्रात अनेक प्रश्न आहेत. ते प्रश्नही विचारावेत असे त्यांनी सांगितले.