आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युवतीची छेड काढणाऱ्याला बदडल्याने अर्धा तास तणाव:परिस्थिती नियंत्रणात; जखमी युवकावर शासकीय रुग्णालयात उपचार

जळगाव10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

युवतीचा पाठलाग करून छेड काढणाऱ्या युवकाला तिघांनी लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण केली. ही घटना शनिवारी सायंकाळी पावणेसहा वाजेच्या सुमारास समता नगरात घडली. परिसरात अर्धा तास तणाव हाेता. पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचताच परिस्थिती नियंत्रणात आली.

सय्यद अकबर सय्यद सलाउद्दीन (वय २२, रा. वंजारी टेकडी, समतानगर) असे जखमी युवकाचे नाव आहे. त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सय्यद अकबर हा एका युवतीचा पाठलाग करीत होता. तिला सतत त्रास देत होता. त्याच्या त्रासाला ती युवती कंटाळली होती. युवतीच्या फिर्यादीवरून त्याच्याविरुद्ध रामानंदनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आपल्या भागात युवतीची छेडखानी झाल्याची माहिती मिळताच तिघांनी सय्यद अकबर याच्याशी मोबाइलद्वारे संपर्क साधला. त्यांनी त्याला समतानगर परिसरात बोलावले. तो तेथे आल्यानंतर तिघांनी लाठ्या, काठ्यांनी त्याला बेदम मारहाण केली. या घटनेनंतर दोन्हीकडील जमाव जमल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. परिसरात रात्री उशिरापर्यंत पोलिस लक्ष ठेवून होते.

पोलिस पोहोचले, अनर्थ टळला
सहायक पोलिस अधीक्षक कुमार चिंथा, रामानंदनगरचे निरीक्षक विजय शिंदे व कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. जमाव प्रक्षुब्ध होण्याआधीच पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. जखमी युवक फिर्याद देण्यासाठी पोलिस ठाण्यात आला होता. पोलिसांनी मेमो देऊन त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात तातडीने पाठवले.

घटनास्थळी शांतता, पोलिस दक्ष
समता नगरात जेथे हाणामारीची घटना झाली त्या ठिकाणावर पोलिसांचे लक्ष्य आहे. वरिष्ठ पोलिस अधिकारीही रात्री उशिरापर्यंत येथील हालचालींचा आढावा घेत होते. कायदा व सुव्यवस्थेला गालबोट लागू नये म्हणून पोलिसांकडून सूचना देण्यात आल्या आहेत. कोणीही अफवा पसरवू नये म्हणून विशेष खबरदारी पोलिसांकडून घेतली जाते आहे.

बातम्या आणखी आहेत...