आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजेवणाला मिठाशिवाय चव येत नाही. अनेक जणांना शिजवलेल्या अन्नात वरून आणखीन मीठ घालायची सवय असते; पण हीच सवय आरोग्यासाठी अतिशय घातक ठरू शकते. जे लोक जेवताना, ताटातील पदार्थांवर आणखी मीठ घालून घेतात त्यांना उच्च रक्तदाब, अल्सर, डिहायड्रेशन, हृदयविकार, किडनी या आजारांचा धोका संभवतो. रुग्णाला वेळेपूर्वीच मृत्यू होण्याचा धोका आहे. त्यामुळे महिलांनी स्वयंपाक करताना मिठाचा जपून वापर करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
जास्त मीठ खाण्याने आरोग्यास अपाय होऊ शकतो. अतिरिक्त मिठामुळे बीपीसारख्या समस्या वाढू शकतात. उच्च रक्तदाबाचा त्रास असणाऱ्यांना मीठ कमी खाण्याचा सल्ला दिला जातो. मिठामधील सोडियम शरीराला आवश्यक असते; मात्र त्याचे अतिरिक्त सेवन हृदयासाठी घातक ठरू शकते. सोडियम शरीरातील पाणी शोषून घेते. त्यामुळे अतिरिक्त मीठ खाल्ल्यास डी-हायड्रेशनचा त्रासही होऊ शकतो. आपल्याला जेवताना पापड, लोणचे, सॉस चटणी, चिप्स, वेफर्स असे अनेक पदार्थ खायची सवय असते. मात्र त्यात मिठाचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे असे पदार्थ खाणे टाळावे असे जीएमसीचे डॉ. भाऊराव नाखले यांनी सांगितले. जागतिक आरोग्य संघटनेने मिठाच्या सेवनाबाबत प्रमाण निश्चित केले आहे. प्रौढ व्यक्तीने ५ ग्रॅमपेक्षा अधिक मीठ सेवन करू नये. आपल्या शरीराला २ ग्रॅम सोडियम लागते. त्यासाठी आहारात ५ ग्रॅम मीठ पुरेसं असते. अन्नातून शरीराला सोडियम मिळण्याची मर्यादा १५०० मिलिग्रॅम आहे; पण जर आहारातून मिठाचे सेवन जास्त झाल्यास २३०० मिली ग्रॅम पेक्षाही जास्त सोडियम शरीरात जात आहे.
शरीरात अधिक मीठ गेल्यास त्वचा रोगाचा धोका आहारातून शरीरात मीठ जास्त गेल्यास त्वचा रोग होतो. त्वचा खाजणं, जळजळणं, त्वचेवर लाल चट्टे येणं असे त्रास उद्भवतात. केस प्रमाणापेक्षा जास्त गळतात, अति मिठामुळे हाडातील कॅल्शियमचं प्रमाण कमी होतो. त्यामुळे हाडे ठिसूळ होतात. ऑस्टिओपोरोसिस सारखे आजार होतात. मीठ जास्त खाल्ल्यास घाम आणि लघवीवाटे शरीरातील पाणी वेगानं बाहेर पडतं. त्यामुळे डी-हायड्रेशनचा त्रास होतो. उच्च रक्तदाबामुळे हृदयविकाराचा धोका निर्माण होतो.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.