आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकाही दिवसांपासून हुलकावणी देणाऱ्या पावसाने रविवारी जोरदार हजेरी लावल्याने शहराच्या इंदिरा नगर परिसरातील २५ घरांमध्ये पाणी शिरून अनेकांचे संसार वाहून गेले. दुपारी १२ वाजेपासून रात्री ९ पर्यंत वीजपुरवठा खंडित होता. सर्व नाले ओसंडून वाहू लागले. ८० टक्के पेरण्या झाल्यानंतर पाऊस लांबल्याने खरिपावर दुबार पेरणीचे संकट होते. मात्र, रविवारी दुपारी ४ वाजता वादळासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. खरीप हंगामातील मका, सोयाबीन, कपाशी, भुईमूग आदी पिकांना जीवदान मिळाले आहे. यावर्षी समाधानकारक पाऊस होणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती.
त्यामुळे शेतकऱ्यांनी मशागतीची कामे आटोपून अनेक शेतकऱ्यांनी पेरण्या सुरू केल्या. मात्र पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत होते. त्यामुळे उशिरा का होईना आलेल्या या पावसामुळे पिकांना अशंत: जीवदान मिळाले असून मका, सोयाबीन हिरवीगार झाल्याचे चित्र आहे. दरम्यान, वादळी वारा आणि झाडांच्या फांद्या तुटल्याने, शहरातील विजेच्या तारा तुटून वीजपुरवठा खंडित झाला. लेंडी नाला वाहू लागला तर गांधी चौक बाजारपट्ट्यात रस्ते व नाले जलमय झाले होते.
पुस्तके भिजली, दप्तर वाहून गेली
इंदिरानगर भागात नाल्याचे पाणी घरात शिरल्याने हाहाकार उडाला. दर सेकंदाला पाण्याची पातळी वाढत होती. यात अनेकांच्या घरातील अन्न-धान्य, कपड्यांसह संसारोपयोगी वस्तू वाहून गेल्या. मुलांसाठी नुकतीच घेतलेली शालेय पुस्तके भिजली तर काही जणांचे दप्तर वाहून गेले. रहिवाशांनी संभाव्य धोका ओळखून तातडीने मुलांना बाहेर काढले तर काहींनी त्यांना पलंग व खाटांवर बसवल्याने अनर्थ टळला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.