आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभुसावळ विभागातील भादली येथील चौथ्या लाइनच्या कामासाठी रेल्वे प्रशासनाने मंगळवारी घेतलेल्या ब्लॉकमुळे अप व डाऊन मार्गावरील 11 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्यामुळे प्रवासी सेवा मोठ्याप्रमाणात विस्कळीत झाली. रेल्वेच्या मेमू व पॅसेंजर गाड्यांच्या रद्दमुळे अनेक सर्वसामान्य प्रवाशांनी ऐनवेळी एसटीतून जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पाचोरा, चाळीसगाव, रावेर, शिरपूर, अमळने आदी गाड्यांना प्रवाशांची मोठी गर्दी दिसून आली. तर पुणे व सुरतसाठी एसटीतर्फे एक जादा बस सोडण्यात आल्याचे एसटी प्रशासनातर्फे सांगण्यात आले.
मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळातर्फे जळगाव-भुसावळ दरम्यान चौथ्या लाइनच्या कामासाठी घेण्यात आलेल्या दोन दिवसांचा ब्लॉकमुळे रेल्वेची सेवा विस्कळीत झाली. दरम्यान, मंगळवारी ममू, पॅसेंजर, एक्सप्रेस अशा 11 गाड्या रद्द झाल्याने माहित नसणाऱ्यांनी रेल्वे स्थानकातून काढता पाय घेत बसस्थानकाकडे धाव घेतली. यात प्रामुख्याने नाशिक व सुरतकडे जाणाऱ्या प्रवासी चाकरमान्यांचे हाल झाले.
अनेक चाकरमानी चाळीसगाव, पाचोरा ते थेट नाशिकपर्यंत तर पश्चिम रेल्वेच्या नंदुरबार रेल्वे स्थानकापर्यंत दररोज अप-डाऊन करत असल्याने या प्रवाशांना अधिकचे पैसे मोजत एसटी वा खासगी वाहनाने प्रवास करण्याची वेळ आली.
गर्दीमुळे चोऱ्याही
पोलिस भरतीसंदर्भात प्रशिक्षण घेणाऱ्या प्रकाश विष्णू पगारे यांचा 10 हजार रुपये किमतीचा मोबाइल सव्वाबारा वाजेदरम्यान लंपास झाला. हा तरुण जळगावी पोलिस भरतीसंदर्भात प्रशिक्षणासाठी आला होता. मंगळवारी तो चाळीसगाव बसमध्ये बसत असताना त्याचा मोबाइल लंपास झाल्याचे त्याच्या लक्षात आले. याबाबत त्याने बसस्थानकात सीसीटीव्ही पाहण्याची विनंती केली. मात्र, आधी जिल्हा पोलिस स्टेशनला तक्रार करा मग सीसीटीव्ही फुटेज हाण्यात येईल, असे त्याला सांगण्यात आले.
42 हजार 500 किमी धावतेय बस
''गेल्या दोन दिवसांत प्रवाशांची संख्या वाढल्याने ग्रामीणसाठी जेथे आवश्यकता आहे अशा ठिकाणी बस सोडण्यात येत आहे. तर पुणे व सुरतसाठी जादा बस सोडण्यात आल्या. गेल्या दोन दिवसांपासून एसटी दररोज 42 हजार 500 किलोमीटर धावत आहे.'' - मनोज तिवारी, जळगाव स्थानक प्रमुख.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.