आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हीआयपी क्रमांक वाहनाला मिळावा हे आकर्षण:7777 = 210000 हे कसे काय? आमदार मंगेश चव्हाणांना विचारा

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

‘सात हजार ७७७ म्हणजे दोन लाख दहा हजार’ हे गणित समजत नाही ना? मग चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांना विचारा. ते समजावून सांगतील की त्यांच्यासाठी ७७७७ ही संख्या दोन लाख दहा हजार या मूल्याची कशी आहे ते. अर्थात, यात पहिली संख्या म्हणजे आमदार चव्हाण यांनी त्यांच्या फाॅर्च्युनर या गाडीसाठी मिळवलेला नोंदणी क्रमांक आहे आणि दुसरी संख्या आहे ती त्यांनी तो क्रमांक मिळवण्यासाठी मोजलेल्या रकमेची.

व्हीआयपी क्रमांक वाहनाला मिळावा हे आकर्षण राजकारणी मंडळींमध्येही असते. किंबहुना, राजकारण्यांमध्येच ते अधिक असते असा अनुभव आहे. त्याचा फायदा घेत परिवहन कार्यालय मात्र पैसे कमावते. जळगाव कार्यालयाने या माध्यमातून केवळ आॅगस्ट महिन्यातच तब्बल ३० लाख रुपये कमावले आहेत. आकड्यांचा चढता क्रम, सारखे आकडे, एक हा आकडा, नऊ हा एक किंवा अनेक आकडे असलेला क्रमांक व्हीआयपी क्रमांक म्हणून ओळखले जातात. ते मिळवायचे असतील तर आकड्यांच्या मागणीनुसार त्यासाठी अतिरिक्त किंमत मोजावी लागते. बऱ्याचदा ही किमंत वाहनाच्या किमतीच्या जवळपास देखील पोहोचते. दरम्यान, यापुर्वीही जिल्ह्यात ४१४१ हा खास नंबर बहुचर्चित ठरला हाेता. ताे विशिष्ट फाँटमध्ये लिहिल्यावर ‘दादा’ या शब्दासारखा दिसताे हे विशेष हाेय.

दुचाकी क्रमांक कारसाठी
आमदार मंगेश चव्हाण यांना नव्याने घेतलेल्या चारचाकी वाहनासाठी ७७७७ हा क्रमांक हवा हाेता. हा क्रमांक दुचाकीच्या मालिकेत उपलब्ध होता. चारचाकीच्या मालिकेतून तो विकला गेला होता. त्यामुळे तीन पट अतिरिक्त रक्कम (२ लाख १० हजार रुपये) माेजून तो आमदार चव्हाण यांना घ्यावा लागला. त्यांची फाॅर्च्युनर ही गाडी असून तिची किंमत ४० लाखांच्या घरात आहे.

दाेघांनी माेजले दीड लाख
आमदार चव्हाण यांच्या व्यतिरिक्त जिल्ह्यात आणखी दाेन व्हीआयपी क्रमांक प्रेमींनी प्रत्येकी दीड लाख रुपये परिवहन विभागाला माेजले आहेत. यात नितेश येवसकर यांनी दुचाकी मालिकेतून डीझेड ००७७ या क्रमांकासाठी तर चारचाकीच्या मालिकेतील व्हीआयपी क्रमांक डीव्ही ०१०० यासाठी भुसावळचे व्यावसायिक सय्यद हमीद सय्यद कासम यांनी प्रत्येकी दीड लाख रुपयांचा महसूल भरला आहे.

सर्वाधिक मागणी ९ अंकाला
जळगावचा परिवहन क्रमांक १९ असल्याने १९१९ला मध्यंतरी अधिक मागणी हाेती; सध्या या क्रमांकासाठी ५ हजार रुपये लागतात. जेम्स बाॅण्डचा ००७ येण्यासाठी ७ आकड्यालाही मागणी आहे. ७८६ क्रमांकालाही तशीच मागणी असते. सर्वाधिक मागणी ९ या अंकाला आहे. यात ९, ९९, ९९९, व ९९९९ हा क्रमांक दुचाकीसाठी २० हजार तर चारचाकी वाहनासाठी दीड लाख लागतात.

बातम्या आणखी आहेत...