आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:कृषी बिल 50 टक्के भरल्यास थकबाकी माफ

जळगाव2 महिन्यांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • एक लाख २ हजार ४४९ शेतकऱ्यांनी घेतला योजनेचा लाभ, ३१ मार्चपर्यंत मुदत

कृषी पंपाच्या वीज बिलांमधून थकबाकीमुक्त होण्यासाठी आता केवळ १५ दिवस राहिले आहेत. कृषी वीज बिलाच्या सुधारित थकबाकीची ५० टक्के रक्कम व पूर्ण चालू वीज बिल ३१ मार्चपर्यंत भरल्यास उर्वरित संपूर्ण थकबाकीची रक्कम शेतकऱ्यास माफ करण्यात येणार आहे.

ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या संकल्पनेतून राज्यात कृषिपंप वीजजोडणी धोरण राबवण्यात येत आहे. त्यानुसार जिल्ह्यातील २ लाख ८ हजार ५०७ शेतकऱ्यांच्या मूळ थकबाकीमधील व्याज व विलंब आकारातील सूट, वीजबिल दुरुस्ती समायोजन तसेच महावितरणकडून निर्लेखनाचे एकूण ११५६ कोटी रुपये माफ करण्यात आले आहेत. त्यामुळे सध्या शेतकऱ्यांकडे वीज बिलांपोटी २१९० कोटी रुपयांची सुधारित थकबाकी आहे. त्यापैकी ५० टक्के थकबाकी तसेच सर्व चालू वीजबिलांचा येत्या ३१ मार्चपर्यंत भरणा केल्यास उर्वरित ५० टक्के म्हणजे १०९५ कोटी रुपयांची माफी शेतकऱ्यांना मिळणार आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील एक लाख २ हजार ४४९ शेतकऱ्यांनी १०९ कोटी ४७ लाख रुपयांचे वीज बिल भरून योजनेचा लाभ घेतला आहे. कृषी बिलाच्या थकबाकीतून मुक्त होण्यासाठी, शेतकऱ्यांना संधी उपलब्ध आहे, त्याचा लाभ घ्यावा.

वसुलीमुळे विकास कामांत वाढ
कृषिपंप वीजजोडणी धोरणानुसार कृषी वीजबिलांच्या चालू व थकीत बिलांच्या भरण्यामधील ६६ टक्के रकमेचा कृषी आकस्मिक निधी हा ग्रामपंचायत (३३ टक्के) आणि जिल्हास्तरावर (३३ टक्के) कृषी वीजयंत्रणेच्या विस्तारीकरण व सक्षमीकरणासाठी उपलब्ध करून दिला जातो. जिल्ह्यात आतापर्यंत ११८ कोटी ५९ लाख रुपयांचा निधी जमा झाला आहे. यात ३९ कोटी १३ लाख रुपयांचा निधी ग्रामपंचायत व जिल्हा क्षेत्रातील वीजयंत्रणेच्या विकास कामांसाठी वापरण्यात येत आहे. त्यामुळे कृषिपंपांच्या नवीन वीजजोडण्या, योग्य दाबाने व सुरळीत वीजपुरवठ्यासह स्थानिक वीजयंत्रणेच्या व सक्षमीकरणाला वेग मिळाला आहे.

बिल दुरुस्तीसाठी मेळावे
ज्या शेतकऱ्यांची वीज बिलांबाबत तक्रार किंवा शंका असेल त्याचे तातडीने निराकरण करण्यात येत आहे. जिल्ह्यात ३१ मार्चपर्यंत विविध गावांमध्ये कृषी ग्राहकांच्या देयक दुरुस्ती संदर्भात शिबिरे आयोजित करण्यात येत आहेत. शिबिरांमध्ये ग्राहकांचा मंजूर वीजभार, मीटर वाचन, थकबाकी या स्वरुपाच्या सर्व तक्रारींचे निराकरण करण्यात येत आहे. कृषी ग्राहकांच्या बिल दुरुस्तीचे प्रस्ताव मंजूर करुन दुरुस्तीनंतरची सुधारित थकबाकीची रक्कम ग्राहकांना तत्काळ कळवण्यात येत आहे. या शिबिरांचा कृषी ग्राहकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.

बातम्या आणखी आहेत...