आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकाळाची गरज व अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर म्हणून ऑनलाइन आर्थिक व्यवहाराचे प्रमाण वाढले आहे. तसे फसवणुकीचे प्रकार देखील वाढले आहे. असे व्यवहार करताना किंवा माहिती देताना स्मार्ट बँकिंग बरोबर सेफ बँकिंग म्हणजे काळजी घेणे महत्त्वाचे आहे. फसवणूक झाल्यानंतर काय करावे याबाबत काही सूचत नाही. अशा वेळी नागरिकांनी घाबरून न जाता २४ तासांच्या आत आपले खाते असलेल्या बँकेत शाखेत किंवा सायबर क्राइममध्ये लेखी तक्रार करावी. या तक्रारीनंतर बँकेने तत्काळ फंड हाेल्ड केल्यास कमीत कमी ७२ तासांच्या आत फसवणूक झालेल्या व्यक्तीस आपले पैसे परत मिळण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे फसवणुकीनंतर नागरिकांनी तक्रार करणे गरजेचे असल्याचा माेलाचा सल्ला बँकिंग तज्ज्ञ जितेंद्र बरडे यांनी जळगावरांना दिला.
रोटरी जळगाव वेस्टतर्फे रोटरी भवनमध्ये ‘स्मार्ट बँकिंग सेफ बँकिंग'' या विषयावर जितेंद्र बरडे यांचे व्याख्यान नुकतेच झाले. यात त्यांनी विविध स्लाइडच्या माध्यमातून फसवणूक झाल्यास काय केले पाहिजे व सावधगिरी म्हणून काय काळजी घेतली पाहिजे यावर मार्गदर्शन केले. या वेळी प्रेसिडेंट इलेक्ट मनोज जोशी, मानद सचिव गिरीश कुलकर्णी, वेस्टच्या प्रेसिडेंट इलेक्ट सरिता खाचणे, विवेक काबरा उपस्थित होते.
ऑनलाइन खरेदीसाठी पेमेंट वॉलेट वापरा
ऑनलाइन फसवणुकीतून पैसे, डेबिट/क्रेडिट कार्ड तपशील, कालबाह्यता तारीख, सीव्हीव्ही पिन व ओटीपी फोन/ईमेल/व्हॉट्सअॅप लिंक शेअर करू नका. कोणतीही लिंक उघडू नका किंवा अज्ञात व्यक्तीने शेअर केलेला क्यूआर कोड स्कॅन करू नका.
नागरिकांनाे, फसवणूक झाल्यास न घाबरता हे करा
आपली फसवणूक झाल्यास डेबिट संदेश काळजीपूर्वक वाचा, जर तुमच्याकडून संशयास्पद व्यवहार झाला नसेल तर बँकेच्या कस्टमर केअर नंबरवर कॉल करा आणि अकाउंट, डेबिट/क्रेडिट कार्ड त्वरित ब्लॉक करा. बँकेच्या सेवा हेल्प डेस्कवर ई-मेल करा. तसेच बँक खाते असलेल्या शाखेला सूचना देत लेखी तक्रार करून पोहोच पावती घ्या. पोलिस स्टेशनच्या सायबर गुन्हे अन्वेषण शाखेत बँकेची पावती दाखवून तक्रार नोंदवावी. तसेचwww.cyberc rime.gov.inवर ऑनलाइन तक्रार नोंदवता येते. तक्रारीनंतर बँक व पोलिस स्टेशनकडे नियमित पाठपुरावा करत राहण्याचाही सल्ला त्यांनी दिला.
अशी केली जाते ऑनलाइन फसवणूक
केवायसी अपडेट, सीम कार्ड ब्लॉक होणे, वीज बिल न भरल्यामुळे विद्युत पुरवठा बंद करण्याचे संदेश, क्रेडिट कार्ड अपग्रेड, इन्शुरन्स पॉलिसीवर बोनस, केबीसी लॉटरी, आयटी रिटर्न, लोन अॅप, विदेशातील नोकऱ्या, विवाहविषयक साइट्स, एटीएम सेंटरवर कार्ड बदलवणे आदी प्रकारे नागरिकांची फसवणूक होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.