आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्हाभरातील सरकारी नोकरांसह राजकीय पक्षांचे लक्ष लागून असलेल्या ग. स. सोसायटीच्या निवडणुकीत मतांच्या विभागणीचा फटका सर्वच पॅनलला बसला. एकाही पॅनलला बहुमत न देता मतदारांनी त्रिशंकू स्थिती निर्माण केली आहे. सत्तेसाठी दोन गटांना एकत्र यावे लागेल. बहुमतासाठी सहकार पॅनलला दोन जागांची गरज भासणार आहे. युतीची चर्चा फिस्कटल्यास ग.स.त पुन्हा फोडाफोडीचे राजकारण रंगण्याची शक्यता आहे.
जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढीच्या २१ जागांसाठी झालेल्या चुरशीच्या निवडणुकीचा निकाल १ मे रोजी पहाटे जाहीर करण्यात आला. तब्बल १९ तासांपेक्षा जास्त वेळ मतमोजणीची प्रक्रिया चालली. सर्वच पॅनलसाठी प्रतिष्ठेचा मुद्दा ठरल्यानंतर संपूर्ण जिल्ह्याचे निकालाकडे लक्ष लागून होते. मतमोजणीनंतर कोणत्याही पॅनलला एकहाती सत्ता मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. सहकार गटाला ९, लोकसहकार व प्रगती गटाला प्रत्येकी ६ जागा मिळाल्या.
दोघांची हॅट्ट्रिक, पाटलांचा पाचव्यांदा ‘उदय’
ग. स. सोसायटीच्या इतिहासात पाच वेळा निवडून येण्याचा बहुमान उदय पाटील यांना मिळाला आहे. माजी उपाध्यक्ष अजबसिंग पाटील, सुनील सूर्यवंशी, ज्ञानेश्वर सोनवणे तिसऱ्यांदा निवडून आले. पाटील व सूर्यवंशी यांनी हॅट्ट्रिक केली. प्रतिभा सुर्वे, रागिणी चव्हाण आणि रावसाहेब पाटील यांना दुसऱ्यांदा संचालकपदी संधी मिळाली आहे.
दिग्गजांचा पराभव
ग. स. सोसायटीत सर्वात मोठा पराभव ओबीसी मतदारसंघात झाला आहे. रावसाहेब पाटील यांनी दोन वेळा अध्यक्ष राहिलेल्या व तीन वेळा संचालक राहिलेल्या विलास नेरकरांचा पराभव केला. बीडीओ म्हणून सेवानिवृत्त झालेले सुभाष जाधव व यशवंत सपकाळे यांना मतदारांनी नाकारले. अनिल सुरडकर हे सुरुवातीला आघाडीवर होते. मात्र, शेवटच्या टप्प्यात जिल्हा परिषदेचे शिक्षण विस्तार अधिकारी विजय पवार यांनी विजयी मुसंडी मारली.
पॅनल प्रमुख म्हणतात...
युतीसाठी प्रस्ताव आले आहेत. सभासद केंद्रस्थानी ठेवून वाटचाल करणाऱ्यांसोबत युती करू. चर्चा सुरू आहे. लवकरच निर्णय घेऊ.
मनोज पाटील, लोकसहकार पॅनल
दाेन दिवसांत पॅनलच्या विजयी झालेल्या उमेदवारांची बैठक आहे. त्यात भविष्याची दिशा ठरेल. थेट कोणत्याही प्रमुखाशी बोलणे नाही; परंतु ज्यांचा प्रस्ताव योग्य असेल त्यांच्यासोबत युती होईल. उदय पाटील, सहकार पॅनल
प्रस्थापितांच्या विरोधात लढलो आहोत. आमच्या अजेंड्यानुसार जे काम करतील त्यांच्याशी युतीचा विचार करण्यात येईल. अध्यक्षपदासाठी स्वत: उमेदवारी करणार आहे. दोन दिवसांत राजकीय हालचाली होतील. रावसाहेब पाटील, प्रगती पॅनल
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.