आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फुप्फुस:शहरात एक तास मास्क न लावता फिराल तर 10 सिगारेटने होते तितके फुप्फुस होईल खराब

प्रदीप राजपूत | जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शुद्ध हवा मिळावी म्हणून तुम्ही सकाळी आणि सायंकाळी फिरायला जात असाल तर सावधान ! सध्या जळगावात हवा प्रचंड प्रदूषित असून, शनिवारी त्याचा अक्षरश: विक्रम झाला आहे. दिवळीत होते त्यापेक्षा प्रदूषणाचे हे प्रमाण दुप्पट असून मुंबई वगळता राज्यात ते सर्वाधिक आहे. त्यामुळे मास्क न लावता शहरात एक तास फिरणाऱ्यांच्या फुप्फुसावर १० सिगारेट ओढल्यावर होईल तितका दुष्परिणाम रोज होतो आहे.

ही धक्कादायक माहिती वायू दर्जा निर्देशांकामुळे (एअर क्वालिटी इंडेक्स) समोर आली आहे. शहरात रस्त्यांवरील खड्डे आणि काही ठिकाणी सुरू असलेली कामे यामुळे धुळीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे या प्रदूषणात सर्वाधिक वाटा धूलिकणांचा आहे. थंडीमुळे हवेत आर्द्रता वाढली असून, ती वर गेलेल्या धूलिकणांना ओले करते आहे. त्यामुळे ते धूलिकण खाली येत असून, त्यामुळे शहरावर दाट धुके पसरते आहे. शनिवारी सकाळी साडेदहा वाजता प्रदूषित हवेच्या निर्देशांकाने १६४ची पातळी गाठली. जी ठिकाणे शुद्ध हवेसाठी ओळखली जातात, तिथे हा निर्देशांक शून्य ते ५० असतो. त्यावरून या प्रदूषणाची कल्पना यावी.

वाऱ्याचा वेग मंदावला
सध्या वाऱ्याचा वेग अत्यंत मंद झाला आहे. गेल्या आठवड्यात ताशी आठ ते १० किलोमीटर वेगाने वाहणारे वारे गेल्या दोन दिवसांपासून चार किलोमीटर वेगाने वाहत आहेत. त्यामुळे हवेत जाणाऱ्या धुलिकणांचे वहन होत नाही. त्याचा परिणाम पहाटेच्या वेळी शहरावर अक्षरश: विषारी वायूची चादर पांघरली जाते आहे. कारण थंडीमुळे धुके निर्माण होते. त्यातील बाष्प धूलिकणांना वर जाऊ देत नाही. हवेतील इतर धोकादायक घटकांच्या बाबतीतही असेच होते. त्यामुळे थंडीच्या दिवसात हवेतील प्रदूषणाचे प्रमाण वाढते, असे तज्ज्ञांनी सांगितले. मात्र, गेल्या दोन दिवसांत त्याने उच्चांक गाठले आहेत. मागच्या वर्षी डिसेंबरमध्ये असलेल्या निर्देशांकापेक्षा यंदाचा निर्देशांक १५ अंकांनी जास्त आहे.

हायर अॅन्टिबायोटिक औषधे देखील ठरताहेत निष्प्रभ
या प्रदूषणात संध्याकाळच्या वेळी एक तास फिरणे म्हणजे १० सिगारेट ओढण्यासारखे आहे. या हवेचा परिणाम शहरातील नागरिकांच्या आरोग्यावर मोठ्या प्रमाणात जाणवतो आहे. सर्दी, खोकला, घसा खवखवणे हे त्रास बरे करण्यासाठी जास्त शक्तीची अॅन्टिबायोटिक औषधेही निष्पभ्र ठरत आहेत. १५-१५ दिवस हा त्रास औषधांनीही बरा होत नसल्यामुळे रुग्णांना कोणती औषधे द्यावीत, असा प्रश्न पडतोय.
- डाॅ.कल्पेश गांधी, छाती विकारतज्ञ,जळगाव

धूलिकणांमुळेच इंडेक्स वाढतो
हिवाळ्यात हवा स्थिर असल्याने धूलिकण उन्हाळ्याप्रमाणे हवेसाेबत वाहून जात नाहीत. त्यामुळे या दिवसांत धूलिकणांचे हवेतील प्रमाण अधिक असते. परिणामी हवेची गुणवत्ता खराब हाेऊन एक्यूआय इंडेक्स वाढताे.
- एस. टी. इंगळे, प्र-कुलगुरू तथा विभागप्रमुख पर्यावरण, पृथ्वीविज्ञान

बातम्या आणखी आहेत...