आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेशनचा काळाबाजार:जळगावमध्ये 105 क्विंटल गहू, तांदूळ जप्त; लाभार्थ्यांना डावलून खुल्या बाजारात विक्री करण्याचा प्रयत्न

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

रेशन दुकानातील अडीच लाख किमतीचे धान्य परस्पर खुल्या बाजारात विक्रीसाठी नेत असतानाच पुरवठा तपास अधिकाऱ्यांनी जप्त केले. या प्रकरणी शहरातील राजमालती नगरातील रेशन दुकानदार महिलेच्या पतीविरुध्द शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाईत पोलिसांनी २०० गाेण्यांमधील १०५ क्विंटल गहू व तांदूळ जप्त केले आहेत. महेमूद बिस्मील्ला पटेल असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

नेमके प्रकरण काय?

महेमूद बिस्मील्ला पटेल याची पत्नी खान्देश महिला सोसायटी जळगाव येथील रेशन धान्य दुकानाच्या अध्यक्ष आहेत. माहिती अधिकार कार्यकर्ते दीपक गुप्ता यांनी पटेल यांच्या दुकानातील रेशनचे धान्य काळ्या बाजारात विक्रीसाठी जात असल्याची माहिती तहसीलदार नामदेव पाटील यांना दिली होती. त्यानुसार नायब तहसीलदार विशाल सोनवणे व पुरवठा तपासणी निरीक्षक जगदिश गुरव हे राजमालती नगरात तपासणीसाठी गेले होते. महेमूद पटेल याच्या घरासमोर लाल रंगाची मालवाहू गाडी उभी होती. अधिकाऱ्यांचे वाहन तेथे पोहोचताच दोन्ही वाहनांवरील चालक त्यांना बघून घटनास्थळावरून पळून गेले.

व्हिडीओ शुटींग करून पंचनामा

अधिकाऱ्यांनी वाहनांची तपासणी केली असता एका वाहनात सुमारे २०० तांदूळाच्या गाेण्या होत्या. दुसऱ्या वाहनात गव्हाच्या ३५ गोण्या होत्या. वाहने उभी असलेल्या पटेल याच्या घराच्या तळमजल्यावरही अधिकाऱ्यांना धान्याचा गोण्या आढळून आल्या. तेथेही १६० गोण्या गहू, तांदूळ, ज्वारी व मका यांनी भरलेल्या होत्या. सुमारे २२५ प्लास्टीक गोण्या रिकाम्या आढळून आल्या. तहसीलदारांनी धान्याच्या गोण्यांबाबत विचारले असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मालाची मुळ पावतीही त्याने सादर केली नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांनी व्हिडिओ शुटींग करून पंचनामा केला.

गुन्हा केला दाखल

माल भरलेली दोन्ही वाहने ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणली. त्यामध्ये २ लाख २५ हजार रुपये किमतीचा ९० क्विंटल तांदूळ, २२ हजार ५०० रुपये किमतीचा १५ क्विंटल गहू व रिकाम्या गोण्या असा एकूण २ लाख ४८ हजार ५०० रुपयांचे धान्य जप्त करण्यात आले. पुरवठा तपासणी अधिकारी डी. बी. जाधव यांच्या फिर्यादीवरुन महेमूद पटेल याच्याविरुध्द शहर पोलिस ठाण्यात जीवनावश्यक वस्तू कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...