आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकीय:जळगावमध्ये भाजपचे 24 नगरसेवक सेनेच्या गळाला, महापौर निवडणुकीच्या तोंडावर अज्ञातस्थळी रवाना

जळगावएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
लढ्ढा फार्महाऊसवर जमलेले शिवसेनेचे पदाधिकारी. - Divya Marathi
लढ्ढा फार्महाऊसवर जमलेले शिवसेनेचे पदाधिकारी.

शनिवारी (सहा मार्च) शहरातील पद्मालय या शासकीय विश्रामगृहात भाजपच्या काही नगरसेवकांची राष्ट्रवादीच्या अशोक लाडवंजारी यांच्याशी ‘योगायोगा’ने झालेली भेट आणि चर्चा यांनी महापालिकेच्या राजकारणात वेगळाच योग घडवून आणला असून भाजपचे २४ नगरसेवक १४ मार्चच्या दुपारपासून ‘नाॅट रिचेबल’ झाले आहेत. त्यांच्यासोबत एमआयएम पक्षाचे तीन नगरसेवकही संपर्क क्षेत्राच्या बाहेर असल्याचे त्यांचा भ्रमणध्वनी सांगतो आहे. हे ‘योगासन’ जमले तर येत्या १८ मार्चला शिवसेनेच्या नगरसेविका महापौर आणि भाजपतून बाहेर पडलेले एक नगरसेवक उपमहापौर हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही.

माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यापासून ते भाजपला ताकद दाखवल्याशिवाय राहाणार नाहीत, असे बोलले जात होते. त्यातच सहा मार्चच्या शनिवारी त्यांचे खंदे समर्थक अशोक लाडवंजारी यांनी भाजपच्या काही नगरसेवकांची विश्रामगृहात भेट घेऊन चर्चा केली. त्यात विद्यमान उपमहापौर सुनील खडके, नगरसेवक किशोर बाविस्कर, कुलभूषण पाटील, चेतन सनकत आणि दोन नगरसेविकांचे पती यांचा समावेश होता. ‘दिव्य मराठी’चे वार्ताहर आणि छायाचित्रकार तिथे पाेहोचल्यावर आश्चर्यचकीत झालेल्या त्या सर्वांनी आपली योगायोगाने भेट झाल्याचा खुलासा केला होता. त्याच वेळी महापालिकेच्या राजकारणात काही गणिते मांडली जात असल्याची चर्चा सुरू झाली हाेती. त्याचा प्रत्यय रविवारी आला.

भाजपचे २८ नगरसेवकही रवाना... नऊ सदस्या घरीच, पण त्या पक्षासोबत असल्याचा दावा
या सर्व घडामोडींत भाजपच्या नेत्यांनीही वेगाने हालचाली सुरू केल्या. कोरोनावरील उपचारासाठी मुंबईत असलेले आमदार सुरेश भोळे सकाळीच जळगावात दाखल झाले. विश्रामगृहावरून त्यांनी सूत्रे हलवली. तातडीने हालचाली सुरू करण्यात आल्या. एक नगरसेवक औरंगाबाद येथे गेले होते. त्यांना थेट विमानतळावर बोलावण्यात आले. या सर्व नगरसेवकांना तीन दिवस राहाण्याच्या तयारीने बोलावण्यात आले होते. एकूण २८ नगरसेवक आणि काहींच्या कुटुंबातील सदस्य यांना घेऊन विठ्ठला ट्रॅव्हल्सच्या दोन आराम बसेस विमानतळावरून रवाना केल्या. नऊ नगरसेविका घरीच थांबल्या असून त्या पक्षाबरोबरच असल्याचा दावा करण्यात आला आहे. ते खरे मानले तर भाजपकडे असलेल्या नगरसेवकांची संख्या ३७ पर्यंत पोहोचते. मात्र, भाजपकडे ३३च नगरसेवक असल्याचीही माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

भाजपचे २४, एमआयएमचे तिघे
मिळालेल्या माहितीनुसार रविवारी दुपारी या हालचालींना गती आली. आधी पाळधी येथील एका फार्म हाऊस मध्ये नगरसेवकांना नेण्यात आले. त्यात भाजपचे २४ नगरसेवक आणि एमआयएमचे तिघे होते. त्याचवेळी शिवसेनेचे १५ नगरसेवक नितीन लढ्ढा यांच्या फार्महाऊसवर पोहोचले. त्यामुळे एकूण ४२ नगरसेवक महापौरपदाच्या निवडणुकीत भाजप नगरसेवकाच्या विरोधात मतदान करतील, अशी शक्यता आहे. त्यामुळे शिवसेनेच्या महिला नगरसेविका महापौर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नगरसेवक गेले भेटून
भाजपचे नगरसेवक आज मला भेटायला आले होते ते त्यांच्या कामासाठी. मी पालकमंत्री असल्यामुळे त्यांच्या समस्या, मागण्या मांडण्यासाठी ते भेटायला येऊ शकतात. दुपारीच ते सर्व इथून निघून गेले आहेत. कुठे गेले आहेत मला माहिती नाही. गुलाबराव पाटील, पालकमंत्री

... तर पक्षांतरबंदी कारवाई
राज्यातील सत्ताधाऱ्यांकडून घोडेबाजार सुरू आहे. उद्या भाजप व्हीप बजावणार असून त्याचा भंग करणाऱ्यांचे सदस्यत्व रद्द होऊन त्यांना ६ वर्षांसाठी निवडणूक लढवायला बंदी घातली जाऊ शकते. मंत्री पाठीशी असले तरी पक्षांतरबंदी कायद्यापासून कोणी वाचवू शकत नाही. गिरीश महाजन, आमदार, भाजप

शिवसेनेचाच महापौर
येत्या १८ तारखेला शिवसेनेच्याच नगरसेविका महापौर होतील हे नक्की. आमच्याकडे पूर्ण बहुमत आहे. सोमवारी महापौरपदासाठी शिवसेनेतर्फे अर्ज विकत घेतला जाईल. हे कसे होईल, हे योग्य वेळी कळेलच. नितीन लढ्ढा, शिवसेनेचे मनपा नेते

पक्षीय बलाबल भाजप ५७ शिवसेना १५ एमआयएम ३ एकूण : ७५

बातम्या आणखी आहेत...