आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यात अवैध सावकारांनी शेतकऱ्यांची बळकावलेली ९६ एकर शेती परत करण्याची राज्यातील सर्वात मोठी कारवाई झाली. त्याचा सावकारांवर वचक बसण्याऐवजी अवैध सावकारीच्या तक्रारीत १६ टक्के वाढ झाली. दुसरीकडे परवानाधारक सावकारांकडूनही बिगरशेती कर्जवाटपात २२ टक्के घट झाली.
शेतकऱ्यांच्या भोवतीचा सावकारीचा पाश वाढल्याचे चित्र आहे. सन २०२२मध्ये सहकार विभागाकडे अवैध सावकारीबाबतच्या ८६ तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. त्याबाबत तालुकास्तरावर व जिल्हा उपनिबंधकांकडे सुनावण्या झाल्या. रावेर, यावल तालुक्यातील १८ शेतकऱ्यांची सावकारांनी बळकावलेली शेती परत करण्याचे जिल्हा उपनिबंधकांनी सावकारांना आदेश दिले.
त्या शेतीचा ताबा शेतकऱ्यांना देण्यात आला. या कारवाईनंतर अवैध सावकारीवर वचक बसेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत सन २०२३मध्ये आतापर्यंत तालुकास्तरावर अवैध सावकारीच्या १०२ तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. त्यावर सुनावणी सुरू आहे.
सन २०२१-२२ या आर्थिक वर्षात जळगाव जिल्ह्यात ११४ परवानाधारक सावकारांनी १ हजार ६६७ कर्जदारांना २ कोटी ८० लाखांवर बिगरशेती कर्जवाटप केल्याची सहकार विभागाकडे नोंद आहे. सन २०२०-२१ मध्ये १०५ सावकारांनी २ हजार १८१ कर्जदारांना ३ कोटी ५४ लाख ५१ हजार रुपयांचे बिगरशेती कर्जवाटप केल्याची माहिती दिली आहे.
सावकारांचे दप्तर तपासणी हाेणार
परवानाधारक सावकार तारण कर्ज नऊ टक्के तर विनातारण कर्ज ११ टक्के व्याजाने देतात. या सावकारांनी वाटप केलेल्या पूर्ण कर्जाची माहिती सहकार विभागाला देणे अपेक्षित आहे. त्यांनी कर्जवाटपाची पूर्ण माहिती दिली नसल्याचीही शंका व्यक्त करण्यात येत आहे. त्यांचे दप्तर सहकार विभागाकडून तपासण्यात येणार आहे. सावकारांनी नियमापेक्षा जास्त व्याजाने कर्जवाटप केले असल्यास तक्रार करण्याचे आवाहन सहकार विभागातर्फे करण्यात अाले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.