आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:जळगावात घाऊक अन् किरकोळ व्यापाऱ्यांनी बाजारपेठेत सजवली राख्यांची दुकाने

जळगाव12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

लॉकडाऊनमुळे सन २०२०मध्ये कोरोनाच्या दहशतीत लाखो बहिणी आपल्या भावाच्या हातावर राखी बांधू शकल्या नाहीत. तर २०२१मध्ये लॉकडाऊन काळात सवलत दिली असली तरी रक्षाबंधन कोरोनाच्या दहशतीतच साजरे करण्यात आले. मात्र, कोरोनामुळे रक्षाबंधनावर आधारित कारभारात निरुत्साह दिसून आला. यंदा मात्र व्यापाऱ्यांत रक्षाबंधनासाठी उत्साह दिसून येताे आहे. घाऊक व किरकोळ व्यापाऱ्यांनी यंदा इंदूर, अहमदाबाद, बडोदा, मुंबईहून राख्या आणत दुकाने सजवली आहेत. यंदा सर्वच व्यापाऱ्यांनी चायना मालाला दुर्लक्षित केले आहे.

शहरातील फुले मार्केटमधील राख्यांचे व्यापारी नंद पारप्यानी यांनी सांगितले की, जळगावात इंदूर, अहमदाबाद, बडोदा, मुंबईहून राख्यांची खरेदी केली आहे. या सर्वच ठिकाणांवर विविध प्रकार, आकाराच्या आकर्षक राख्या आहेत. रक्षाबंधनाला दहाच दिवस शिल्लक असल्याने महिलांनी बाहेरगावी असलेल्या भावासाठी स्पीड पोस्ट, कुरीअर व टपालाने राखी पाठवायला सुरुवात केली आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपासून पावसाचे वातावरण आहे. अधून-मधून पावसाचा शिडकावा हाेताे आहेे. या पार्श्वभूमीवर राख्यांची विक्री अपेक्षेनुसार वाढलेली नाही. दाेन दिवसांत बाजारपेठेत राख्या खरेदीसाठी गर्दी हाेऊ शकते.

८०० रुपये डझनपर्यंत आहेत भाव
कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून व्यापारी घाबरलेले होते. त्यामुळे या दोन वर्षांत खूपच कमी प्रमाणात राख्या मागवल्या. शहरात १५ रुपये डझनपासून ते ८०० रुपये डझनपर्यंतच्या राख्या बाजारात मिळत आहे. चायनीज राख्यांना बाजारात थारा नसल्याचा दावाही व्यापाऱ्यांनी केला आहे. १० ते २० हजार रुपयांचा माल खरेदी करणारे लहान व्यापाऱ्यांनीही थेट इंदूर, अहमदाबाद, बडोदा आणि मुंबईहून माल खरेदी करून विक्रीसाठी आणला आहे.

या राख्यांना मागणी
बाजारात नवनवीन पद्धतीच्या, आकाराच्या आकर्षक राख्या आल्या आहेत. यात ज्वेलरी पॅटर्नच्या राख्या, जरिकामसह लाइटिंग असलेल्या राख्या, चमकदार वेस्टर्न, आकर्षक मण्यांनी मढवलेल्या राख्या, पटवा राख्या, चंदनाचा सुगंध देणाऱ्या सुगंधी राख्या, चांदीत मिणा भरलेल्या राख्या बाजारात विक्रीसाठी आल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...