आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्त्यांची ‘वाट’ लागली:नवीपेठेत ‘स्क्रॉपिंग’ न करता गुळगुळीत डांबरी रस्त्यावर टाकला जाड खडीचा थर; महापालिकेत समन्वय अन् नियंत्रणाचा मोठा अभाव

जळगाव4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवीपेठेत सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाबाबत धक्कादायक बाब पुढे आली आहे. बॅकस्ट्रीट रस्त्यावर दुभाजकाच्या दोन्ही बाजूने असलेला गुळगुळीत डांबरी रस्ता स्क्रॉपिंग (न उकरताच) न करताच त्यावर जाड खडीचा थर टाकण्यात आला आहे. महापालिकेतील अभियंत्याच्या दाव्यानंतर ‘दिव्य मराठी’ने या रस्त्याची पाहणी केली तेव्हा ही धक्कादायक बाब समोर आली आहे. गुळगुळीत रस्त्यावर स्क्रॉपिंग न करताच खडी टाकल्याने आधीच्या खडीसोबत नव्याने टाकलेली खडी एकजीव होणार नाही. त्याचा परिणाम रस्त्याच्या दीर्घकालीन गुणवत्तेवर होऊ शकतो.

नवीपेठेत गोलाणी मार्केट समोरील रस्ता आणि बँक स्ट्रीटवर अमृतची पाइपलाइन व ड्रेनेजसाठी खोदलेल्या रस्त्यावर खडी टाकून नव्याने रस्त्याची लेव्हल केली जात आहे; परंतु बँकस्ट्रीटवरील अमृत पाइप ते दुभाजकादरम्यान गुळगुळीत रस्त्यावरही जाड खडीचा थर आहे. पावसाचे पाणी साचत असल्याने हा रस्ता उंच केला जातो आहे. दरम्यान, रस्ता उंच करताना त्यावर खडी टाकण्यापूर्वी रस्त्याचा जो भाग डांबरी अथवा गुळगुळीत असेल तो जेसीबीने खोदून किंवा चर मारून काही प्रमाणात उकरणे आवश्यक आहे. असे केले तरच आधीची खडी व नव्याने टाकलेली खडी एकजीव होते. त्यामुळे रस्त्याला अधिक बळकटी येते; पण त्याचा येथे विसर पडला आहे.

दोन इंच कोरल्यानंतर दिसतो सिमेंटचा थर
‘दिव्य मराठी’ने महापालिकेच्या अभियंत्याकडून रस्ते बनवण्याची तांत्रिक माहिती जाणून घेतल्यानंतर खरच त्यांच्या सांगण्याप्रमाणे काम होते आहे किंवा नाही याची पाहणी केली. यात खडी टाकण्यात आलेला रस्ता दोन इंच कोरल्यानंतर त्या खाली सिमेंटचा रस्ता तर दुसऱ्या ठिकाणी डांबरी गुळगुळीत रस्ता असल्याची बाब समोर आली. या गुळगुळीत रस्त्याचे स्क्रॉपिंग न करताच खडीचा थर टाकण्यात आल्याची धक्कादायक बाब या पाहणीतून पुढे आली आहे. त्यामुळे रस्त्याच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातेय.

बातम्या आणखी आहेत...