आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापंचशीलनगर अतिशय दाटीवाटीने वसले आहे. या नगरात रस्ते, गटारी, पथदिवे व ढाप्यावरील स्लॅब अशा सर्वच प्राथमिक गरजांची वानवा आहे. येथे तुंबलेल्या गटारी, पथदिवे न लागल्याने रस्त्यावरील अंधार, तुटलेल्या ढाप्यामुळे दुचाकीलाही नगरात शिरायला करावी लागणारी कसरत आदी समस्या डोकेदुखी ठरत आहे. पावसाळ्यात तर नागरिकांची मोठी गैरसोय होत असते. याबाबत महापालिका प्रशासनाकडे तक्रारी करुन देखील कानाडोळा करण्यात येत आहे. पंचशीलनगर गेल्या अनेक वर्षांपासून समस्यांच्या गर्तेत सापडले आहे. परिसरात अनेक भागांत कच्चे रस्ते आहेत. तुंबलेल्या गटारींवर डास व माशांची सतत भुणभुण सुरू असते. इच्छादेवीकडील रस्त्यावरील तुटका ढापा हा अपघाताला निमंत्रण देणार आहे. तीन वर्षांपूर्वी याच नगरात मोठी आग लागली होती. आता जर अशी काही दुर्घटना घडली तर या तुटक्या ढाप्यामुळे अग्निशमन बंब नगरात प्रवेशदेखील करू शकणार नाही अशी अवघड अवस्था आहे.
पावसाळ्यात गटारीचे पाणी शिरते घरात ^पंचशीलनगरात पाण्याचा निचरा होत नसल्याने पावसाळ्यात गटारींचे पाणी घरात शिरते. परिसरातील गटारींची साफसफाई नियमित होत नसल्याने दुर्गंधी पसरली आहे. पालिकेच्या पाण्याच्या दिवशी या गटारी रस्त्यांवरून वाहतात. या तुंबलेल्या गटारींच्या पाण्यामुळे डासांची उत्पत्ती होऊन नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. मोनू काकर, पंचशीलनगर
ढाप्यामुळे नगरात प्रवेशाला अडचणी ^इच्छादेवी चौकालगत पंचशीलनगरात प्रवेशासाठी गटारीवर सात फुटांचा ढापा तयार करण्यात आला आहे; मात्र हा ढापा चार फूट तुटलेला आहे. त्यामुळे येथून रिक्षा देखील जाऊ शकत नाही. दुचाकी काढायला देखील कसरत करावी लागते. या ढाप्यामुळे अनेक किरकाेळ अपघात देखील झाले आहे. त्यामुळे हा तुटका ढापा लवकरात लवकर तयार करण्याची गरज आहे. अन्यथा आगीसारखी घटना घडल्यास येथे अग्निशमनच्या बंबाला देखील प्रवेश मिळणार नाही. हाशीम शेख, पंचशीलनगर
मातीचे रस्ते, धुळीमुळे नागरिक झाले हैराण ^पंचशीलनगरात गेल्या अनेक वर्षांपासून रस्तेच झालेले नाही. नगरात रस्ते नसल्यामुळे पाऊस पडला की अधिक त्रास होतो. नगर खोलगट भागात वसलेले असल्याने व येथील घरे जमिनीलगत असल्याने पावसाळ्यात अनेकदा रस्त्यावरील पाणी घरात शिरते. येथे कोणत्याही भागात डांबरीकरण, सिमेंटचेच रस्ते नाही तर साधा मुरूमाचाच रस्ता देखील धड नाही. दाटीवाटीने नगर वसलेले असल्याने येथे रिक्षा निघायला देखील अवघड जाते. नागरिकांना मातीच्या रस्त्यांमुळे सतत धुळीचा सामना करावा लागत आहे. रमजान पठाण, पंचशीलनगर
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.