आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:प्रधानमंत्री सडक याेजनेत महाराष्ट्रातील 49% रस्ते एकट्या विदर्भाच्या वाट्याला

प्रदीप राजपूत / जळगावएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मराठवाड्यात 33.63%, उत्तर महाराष्ट्रात 10.85% तर पश्चिम महाराष्ट्रात अवघ्या 5.60% कामांना मंजुरी

तब्बल सात वर्षांनंतर प्रशासकीय मान्यता मिळालेल्या पंतप्रधान सडक याेजनेच्या तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रासाठी जवळपास २ हजार काेटी रुपयांचा निधी २९ जूनला मंजूर झाला आहे. यात ग्रामीण भागात २५८१.७२२ किलोमीटरचे रस्ते हाेणार आहेत. यातील १,२८८.२७३ किमी म्हणजे तब्बल ४९.८९% रस्ते एकट्या विदर्भात हाेणार आहेत. उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्राची मात्र ५ ते १० टक्क्यांवर बाेळवण करण्यात आली आहे. राज्याला केंद्राकडून ७ वर्षांनंतर मिळालेल्या निधीच्या वाटपामध्ये प्रादेशिक असमताेल आहे की स्थानिक खासदार दिल्लीतून निधी आणण्यात अपयशी ठरले, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित हाेत आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाने प्रधानमंत्री ग्राम सडक याेजनेंतर्गत २०१४ नंतर प्रथमच २०२१ मध्ये महाराष्ट्राला रस्ते विकासासाठी १,९१९.७६ काेटींचा निधी मंजूर केला. यातून ग्रामीण भागातील २५८१.७२ किमीच्या ३८० रस्त्यांच्या कामांना २९ जून २०२१ राेजी प्रशासकीय मान्यता मिळाली. या याेजनेतून एकूण २६ जिल्ह्यांसाठी निधी मिळाला असून इतर जिल्ह्यांतील एकही काम मंजूर नाही.

मराठवाडा : १२६ कामे, ८६८ किमीचे रस्ते ... मराठवाड्याच्या वाट्याला ३३.६३% म्हणजे १२६ कामे आली आहेत. ७ जिल्ह्यांत ८६८.६३ किमीचे रस्ते हाेतील. आैरंगाबाद जिल्ह्यात १५१ किमीचे २० रस्ते हाेतील. नांदेडमध्ये १७३ किमीचे २४ रस्ते, उस्मानाबादमध्ये ११९ किमीच्या १७ रस्त्यांना मान्यता मिळाली आहे.

विदर्भाला झुकते माप
विदर्भातील बुलडाणा जिल्ह्यात ८६ किमीचे १७ रस्ते मंजूर आहेत. अमरावतीमध्ये १८० किमीचे २८ रस्ते, चंद्रपूरमध्ये १३६ किमीचे २० रस्ते, भंडाऱ्यात १२४ किमीचे २० रस्ते मंजूर आहेत. नागपूरमध्येही १६९ किमीचे २४ रस्ते मंजूर आहेत.

टप्प्याटप्प्याने निधी मिळेल...
कामे मंजुरीची प्रक्रिया सुरू आहे. तिसऱ्या टप्प्याच्या पहिल्या बॅचची कामे मंजूर झाली आहेत. पुढेही निधी येईल. त्यात आणखी प्रस्ताव पाठवावे लागतील. सर्व प्रक्रिया आॅनलाइन असल्याने मंजुरीला विलंब आहे. - विजय पाटील, कार्यकारी अभियंता, प्रधानमंत्री ग्राम सडक याेजना, नाशिक.

प. महाराष्ट्र : दोनच जिल्ह्यांत कामे
प. महाराष्ट्रात काेल्हापूर व सातारा या दाेनच जिल्ह्यांमध्ये ही कामे हाेणार आहेत. ठाणे जिल्ह्यात ८७ किमीचे १७ कामे हाेतील. या ३ जिल्ह्यांत एकूण १४४.६३५ किमीचे रस्ते मंजूर आहेत. राज्याच्या तुलनेत हे प्रमाण केवळ ५.६० टक्केच आहे.

उत्तर महाराष्ट्र : ३५ कामे, २८० किमीचे ३५ रस्ते
उत्तर महाराष्ट्रात केवळ २८०.३३ किमीचे ३५ रस्ते केले जाणार आहेत. जळगाव व रावेर मतदारसंघात केवळ १८.११० किमीचे दाेनच रस्ते हाेतील. त्यासाठी १२ काेटींचा निधी मंजूर झाला आहे. धुळ्यात अवघा एकच रस्ता, नंदुरबारमध्ये ६ रस्ते, नाशिकमध्ये १८ रस्ते, तर नगरमध्ये ८ रस्त्यांना मंजुरी मिळाली आहे.

विदर्भ : १९१ कामे, १२८८ किमीचे रस्ते
सर्वाधिक ४९.८९ टक्के कामे ही विदर्भात आहेत. ३८० कामांपैकी विदर्भातील ११ जिल्ह्यांना सर्वाधिक १९१ कामे देण्यात आली आहेत. त्यामुळे मंजूर २५८१.७२२ किमीपैकी १२८८.२७३ किमीचे रस्ते एकट्या विदर्भात हाेतील.

बातम्या आणखी आहेत...