आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी ग्राऊंड रिपोर्ट:रावेर तालुक्यात 14 हजार गोवंशाला लम्पी, प्रशासन म्हणते फक्त 263 जनावरांनाच बाधा

वासुदेव नरवाडे | रावेर22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रावेर तालुक्यातील पशुधनावर लम्पी आजाराने जोरदार हल्ला चढवला आहे. सुरुवातीला औषधांचा असलेला तुटवडा, अपूर्ण मनुष्यबळ, उपचाराबाबत अपूर्ण ज्ञान व खरी परिस्थिती लपवण्यामुळे लम्पी दररोज नव्या गावात शिरकाव करत आहे. दीड महिन्यात साधारणत: १४ हजार जनावरांना या आजाराने कवेत घेतले असून १६० गोवंशाचा आतापर्यंत बळी घेतल्याचा पशुपालकांचा दावा आहे. प्रशासन मात्र फक्त २६३ गाेवंशाला लम्पी झाला असून त्यापैकी २२८ जनावरे बरी झाली आहे व आठ जनावरे दगावली असल्याची आकडेवारी देत आहे. लम्पी आजाराने ग्रस्त असलेल्या गावांना भेटी देऊन दिव्य मराठी प्रतिनिधीने पाहणी केली असता हे वास्तव समोर आले आहे.

रावेर तालुक्यात एकूण ५६ हजार ८४० पशुधन असून त्यापैकी ३१ हजार १२० गोवंश तर २५ हजार ७२० म्हैसवर्गीय जनावरे आहेत. महाराष्ट्रात सर्वप्रथम जळगाव जिल्ह्यातील रावेरला यंदा १ ऑगस्ट रोजी या आजाराची लक्षणे आढळली. ३ ऑगस्ट रोजी गुरांच्या रक्ताचे नमुने पुणे येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले. तपासणीत या जनावरांना लम्पी झाल्याचे शिक्कामोर्तब झाले. विवरे बु॥, विवरे खुर्द, चिनावल, मस्कावद, सावदा, खिरोदा, अहिरवाडी, रसलपूर, वाघोदा, केऱ्हाळे, अटवाडे, तांदळवाडी, खानापूरसह अनेक गावांमधील गुरांना या आजाराने आपल्या कवेत घेतले आहे. उपाय योजना म्हणून रावेर, सावदा येथील गुरांचे बाजार बंद करण्यात आहे.

सहा हजार जनावरे लसींपासून वंचित : या आजाराची ऑगस्ट महिन्यात लागण झाली, तेव्हा मुबलक लसींचा पुरवठा नव्हता. पशुसंवर्धनमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी रावेर तालुक्यात गेल्या आठवड्यात दौरा केल्यानंतर लसींचा मुबलक साठा उपलब्ध झाला. मात्र अपूर्ण मनुष्यबळामुळे लसीकरण धीम्यागतीने सुरू आहे. ग्रामपंचायतीने ग्राम निधीतून तसेच काही गावांमध्ये पशुपालकांकडून स्वखर्चातून लसीकरण सुरू आहे. शासन ४०० रुपये मदत करत आहे तर खर्च प्रत्येक शेतकऱ्याला किमान पाच हजारापर्यंत येतो.

बैलजोड्या दगावल्याने शेतकऱ्यांना अश्रू अनावर आता लसींचा मुबलक साठा असला तरी जनावरांचे मृत्यू थांबलेले नाही, विवरे येथील खेमचंद बेंडाळे, शिवाजी पाटील यांचा प्रत्येकी एक बैल दगावला तर प्रकाश दहिभाते यांच्या गोऱ्हा गेला. खिरोदा प्र.रावेर येथील राजू नारायण चौधरी, गोकूळ महाजन व ज्ञानेश्वर महाजन यांच्या लाखांच्या बैलजोड्या लम्पीने हिरावल्या. याबाबत सांगतांना त्यांना अश्रू अनावर झाले हाेते.

बातम्या आणखी आहेत...