आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

म्हसरूळ पोलिस ठाण्याच्या इमारतीचे रूप पालटले:गिरीष महाजनांच्या हस्ते नूतनीकृत इमारतीचे उद्घाटन

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

म्हसरूळ पोलिस ठाण्याच्या नूतनीकृत इमारतीचे उद्घाटन आज राज्याचे ग्राम विकास आणि पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते फित कापून व कोनशिलेचे अनावरण करून झाले.

यावेळी कार्यक्रमास आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, राहुल ढिकले, माजी महापौर रंजना भानसी, विशेष पोलिस महानिरिक्षक बी. जी. शेखर-पाटील, नाशिक शहर पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे, पोलिस उपायुक्त अमोल तांबे, सहपोलिस आयुक्त गंगाधर सोनवणे, वरिष्ठ पोलिस निरिक्षक अशोक साखरे, माजी नगरसेवक अरूण पवार यांच्यासह पोलिस आयुक्तालयातील अधिकारी व नागरिक उपस्थित होते.

यावेळी पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे म्हणाले की, आज म्हसरूळ पोलिस ठाणे इमारतीची बदललेल्या नवीन रचनेमुळे ती अधिकाधिक लोकाभिमूख होणार आहे. पूर्वी इमारतीचे प्रवेशद्वार हे दर्शनी भागात नसल्याने पोलिस ठाणे असूनही ते नागरिकांच्या लवकर लक्षात येत नसे. परंतु आता बदललेले नवीन स्वरूप हे नागरिकांच्या दृष्टीने सोयीचे होणार आहे.

नवीन इमारत प्रशस्त व प्रकाशमय झाल्याने या वास्तूत काम करण्याचा पोलिसांचा उत्साह नक्कीच द्विगुणीत होणार आहे ,असा विश्वास पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी यावेळी आपल्या मनोगतातून व्यक्त केला.

पोलिस उप आयुक्त अमोल तांबे कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात म्हणाले की, पूर्वी मखमलाबाद, म्हसरूळ व पंचवटी या भागासाठी पंचवटी हे एकच पोलिस ठाणे होते. परंतु शहराची वाढती लोकसंख्या , कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न हाताळण्यासाठी याचे विभाजन करून 01 जानेवारी 2016 रोजी म्हसरूळ पोलिस ठाण्याची निर्मिती झाली. हे ठाणे महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था पंचवटी यांच्या इमारतीत भाडेतत्वार सद्यस्थित आहे.

ठाण्याच्या इमारतीचे प्रवेशद्वार हे रहिवाशी परिसराच्या दर्शनी भागात नसल्यामुळे नागरिकांच्या चटकन लक्षात येत नव्हते, त्यामुळे नागरिक तक्रार देण्यासाठी पंचवटी पोलीस ठाणे येथे जात होते. आज इमारतीच्या बदलेली इमारतीची रचना नागरिकांच्या नजरेत येईल अशा प्रकारे झाली आहे. यामुळे नागरिकांची गैरसोय दूर होवून त्यांना तात्काळ मदत मिळणार असल्याचे पोलीस उप आयुक्त अमोल तांबे यांनी सांगितले.

यावेळी आमदार देवयानी फरांदे, राहुल ढिकले यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. स‍ह पोलीस आयुक्त गंगाधर सोनवणे यांनी उपस्थितांचे आभार मानून राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

बातम्या आणखी आहेत...