आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आर्थिक फटका:आवक वाढली, चाळीसगावात कांदा 3 हजारांवरून थेट 1300 रुपयांवर

जळगाव10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिवाळीनंतर तेजीत आलेल्या कांद्याच्या भावात गेल्या १५ दिवसांपासून हजार ते पंधराशे रुपयांनी घसरण झाली आहे. बुधवारी चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची ४०० क्विंटल आवक झाली तर कांद्याला १२०० ते १३०० रूपये भाव मिळाला. १५ दिवसांपूर्वी हा भाव ३००० रुपयांवर होता.गेल्या ८ ते ९ महिन्यांपासून साठवून ठेवलेला कांदा खराब होऊ लागल्याने आहे, तो कांदा बाजारात विक्रीसाठी आणण्याची शेतकरी घाई करत आहे.

दुसरीकडे शेतकऱ्यांचा कांदा अल्प भावात विक्री होत असताना किरकोळ बाजारात मात्र कांदा किलोला ३० रुपयांवर विक्री होत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, दिवाळीनंतर मागणी वाढल्याने कांदा बाजारात तेजी आली होती. कांद्याचे भाव ३ हजार रुपयांपर्यंत गेले होते. त्यामुळे बाजारात आवक वाढली.

नवीन कांद्याची प्रतीक्षा
दिवाळीनंतर कांद्याला चांगला भाव मिळेल, या आशेने ८ ते ९ महिन्यांपूर्वी साठवून ठेवलेला जुना कांदा शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणला. आता हा कांदा संपू लागला आहे. सध्या केवळ ४० ते ५० वाहने अशी आवक होत आहे. आता नवीन कांदा बाजारात येण्यास जानेवारी उजाडेल. नवीन कांदा येईपर्यंत दोन ते अडीच महिने कांद्याची टंचाई जाणवणार आहे.

४०० क्विंटल आवक
बाजार समितीत मंगळवारी कांद्याची ७० वाहने आली. त्यातून ७५० क्विंटल आवक झाली. तर कमाल दर ११८० रूपये, सरासरी दर ८५० रूपये इतका होता. तर बुधवारी केवळ ४० वाहने आली व ४०० क्विंटल कांद्याची आवक झाली. तर १२०० ते १३०० रूपये असा भाव होता. तर सरासरी दर १ हजार रूपये व कमाल दर १४०० रूपये होता.

किरकोळ बाजारात किलोला २५ रू. भाव
एकीकडे कांद्याला अत्यल्प भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागत असताना दुसरीकडे किरकोळ बाजारात किलोला २५ ते ३० रुपये भाव आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहक अडचणीत आले आहेत.

१५ दिवसांपासून कांद्याच्या भावात घसरण
दिवाळीच्या सुटीनंतर बाजार सुरू होताच कांद्याला बऱ्यापैकी भाव मिळाल्याने शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेला कांदा मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी बाहेर काढला होता. मात्र १५ दिवसांपासून कांद्याच्या भावात घसरण होत आहे.

महिनाभरात १७०० रुपयांनी घसरले भाव
गेल्या दोन दिवसांत तर कांद्याचा दर १२०० ते १३०० रुपये झाला आहे. म्हणजे महिनाभरातच कांद्याची सुमारे १७०० रुपये घसरण झाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना भावातील घसरणीचा मोठा फटका बसत आहे.

बातम्या आणखी आहेत...