आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ग्राउंड झीरो रिपोर्ट:असुविधा, अपूर्ण मनुष्यबळामुळे ‘आॅक्सिजन’वर गेलेल्या जळगाव जिल्ह्याच्या आराेग्य यंत्रणेत हाेतेय सुधारणा

जळगाव / विजय राजहंस7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सकारात्मक चित्र : कोरोनाबाधितांचा जिल्ह्याचा रिकव्हरी रेट 77.44 टक्क्यांवर

संपूर्ण जगाला हैराण करणाऱ्या काेराेनाने जळगाव जिल्ह्यालाही हादरवले आहे. जिल्ह्यात बाधितांची संख्या ५० हजारांकडे (४५,४२९) वाटचाल करीत आहे, तर बळींनी हजाराचा टप्पा कधीच (१,१२९) पार केला आहे. उणेपुरे तीन वर्षांपूर्वी सुरू झालेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, निम्म्यांहून कमी मनुष्यबळावर सुरू असलेली ग्रामीण रुग्णालये आणि देशात स्वत:ची १७ मजली इमारत असल्याचा टेंभा मिरवणाऱ्या महापालिकेचे एकही सक्षम रुग्णालय नसल्याने काेराेना संसर्गाचे पडसाद सुरुवातीच्या काळात अधिक गडद झाले. गेल्या तीन महिन्यांत जिल्हा प्रशासन व आराेग्य विभागानेे केलेल्या उपाययाेजनांमुळे कोरोनाबाधितांचा जिल्ह्याचा रिकव्हरी रेट ७७.४४ % तर मृत्युदर २.४९ टक्क्यांपर्यंत कमी झाला आणि त्यातून काहीसा दिलासा देणारे चित्र तयार झाले आहे.

जिल्ह्यात २८ मार्च राेजी काेराेनाचा पहिला रुग्ण समाेर आला. त्यानंतर महिना-दीड महिना संसर्ग नियंत्रित हाेता. परंतु, मेअखेरीस जिल्ह्यात काेराेनाचा धुमाकूळ सुरू झाला आणि संपूर्ण आराेग्य यंत्रणाच हवालदिल झाली. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात डाॅक्टर्स उपलब्ध नसणे, असणाऱ्यांपैकी काहींचे कर्तव्यापासून पलायन अशी अवस्था होती. ५० लाख लाेकसंख्या असलेल्या जिल्ह्याच्या शासकीय आराेग्य यंत्रणेत केवळ १० आयसीयू बेडव्यतिरिक्त एकाही आॅक्सिजन बेडची उपलब्धता नव्हती. त्यात फिजिकल डिस्टन्सिंगचा पहिल्याच लाॅकडाऊनपासून वाजलेला बाेजवारा यामुळे जिल्ह्यातील काेराेनाबाधितांची व मृतांची संख्या वाढत गेली. जिल्ह्यातील काेराेना रुग्णांचा मृत्युदर १६.१९ टक्क्यांवर पाेहाेचल्याने राज्यात जळगाव जिल्हा चर्चेत आला. याच दरम्यान, शासकीय कर्मचाऱ्यांच्या गलथान कारभारानेही जिल्हा आराेग्य यंत्रणेचे वाभाडे समाेर आणले. काेविड रुग्णालयातून पाच दिवस बेपत्ता झालेल्या वृद्धेचा मृतदेह शाैचालयात आढळून आला. त्यामुळे थेट शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठातांसह सहा जणांवर निलंबन करण्यात आले.

काेराेनाने ग्रामीण आराेग्य यंत्रणा हाेतेय सुदृढ...
जिल्हा पंधरा तालुक्यांचा आहे. यात १३ ग्रामीण रुग्णालये व ३ उपजिल्हा रुग्णालये आहेत. या रुग्णालयाचा कारभार ५० टक्क्यांपेक्षा कमी मनुष्यबळावर सुरू आहे. काेराेनाच्या लढाईत आराेग्य यंत्रणेने सामाजिक संस्था, दात्यांना साेबत घेऊन जिल्ह्यातील सर्व ग्रामीण रुग्णालयांत आॅक्सिजन बेडची व्यवस्था केली आहे. आज जिल्ह्यात अशा बेडची संख्या ३ हजारांपर्यंत पाेहचली आहे. पंतप्रधान निधी, राज्य शासन व दात्यांच्या माध्यमातून शासकीय आराेग्य यंत्रणेत तीनशेच्या घरात व्हेंटिलेटर कार्यान्वित झाले आहेत.

व्हीसीत गाजणारा जिल्हा आता चर्चेतून झाला आहे बाद
वाढता संसर्ग, सर्वाधिक मृत्युदर, कर्मचाऱ्यांचा गलथान कारभार आदी कारणांनी राज्याच्या आराेग्य विभागाच्या दरराेज हाेणाऱ्या व्हीसीत गाजणारा जळगाव जिल्हा गेल्या दाेन महिन्यांपासून जिल्ह्यातील काेराेना संसर्ग व उपाययाेजनांचे चांगले फलित समाेर येत असल्याने चर्चेतून बाद झाला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात राबवण्यात आलेला बेडसाइड असिस्टंट या उपक्रमाचे चांगले परिणामही समोर आले आहेत.

आधी खासगी रुग्णालये बंद; आता ३७ रुग्णालयांनी घेतली कोविड रुग्णांवर उपचारांची परवानगी : जिल्ह्यात काेराेनाचा शिरकाव झाल्यानंतर सुरुवातीच्या काळात खासगी डाॅक्टरांनी आपली रुग्णालये बंद ठेवून लांब राहणे पसंत केले हाेते. त्यामुळे काेविडसह नाॅन-काेविड रुग्णांची माेठ्या प्रमाणावर परवड झाली. परंतु, गेल्या दीड-दाेन महिन्यात हे चित्र बदलण्यास सुरुवात झाली आहे. ३७ खासगी रुग्णालयांत रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

मनपाचे सक्षम रुग्णालय असते तर
- देशात स्वत:च्या मालकीची १७ मजली इमारत असल्याचा गाैरव मिरवणाऱ्या जळगाव महापालिकेचे स्वत:चे एकही सक्षम रुग्णालय नाही ही लाजिरवाणी बाब आहे.
- जिल्ह्यात सर्वाधिक संसर्ग हा जळगाव शहरात झालेला आहे. जिल्ह्यातील ४५ हजार ४२९ बाधितांपैकी २२.४७ टक्के म्हणजे १० हजार २०९ बाधित एकट्या जळगाव शहरात आहेत.
- जिल्ह्यातील काेराेना बळींची संख्या १ हजार १२९ आहे. त्यापैकी २१.०८ टक्के म्हणजे २३८ काेराेना बळी हे जळगाव शहरातील आहेत.
- काेराेनाच्या लढाईत सद्य:स्थितीत जिल्ह्यात १३ हजारांवर बेड उभारण्यात आले असले तरी त्यात जळगाव महानगरपालिकेच्या एकाही रुग्णालयाचा समावेश नाही. कारण महापालिकेची चार रुग्णालये शहरात आहेत.
- महापालिका एकही सक्षम रुग्णालय उभारू शकली नाही. तसे असते तर चित्र वेगळे असते.

बातम्या आणखी आहेत...