आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआजच्या युगात शिक्षण महागले असून, गरीब व गरजू कुटुंबीयांना पाल्यांचे शिक्षण करणे अवघड झाले आहे. त्यातच कोरोना काळात अनेकांची आर्थिक घडी विस्कळीत झाली तर काही विद्यार्थ्यांनी आपले पालक गमावले. अशा परिस्थितीतही विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावी व बारावीत चांगले गुण मिळवत यश संपादन केले; मात्र पुढील शिक्षणासाठी पैसे नाही. अशावेळी शिक्षण बंद न करता शहरातील विविध संस्थांच्या मदतीने शिक्षण सुरू ठेवावे, असे आवाहन संस्थांनी केलेले आहे.
महापालिकेतर्फे आर्थिक साहाय्य
जळगाव शहरातील पिवळे व केशरी कार्डधारक कुटुंबातील इयत्ता दहावी व बारावी परीक्षेत ७५ टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा महापालिकेतर्फे सत्कार व अर्थसाहाय्य करण्यात येणार आहे. यासाठी कुटुंबीयांचा जळगाव शहरात किमान १५ वर्षे रहिवास असणे गरजेचे आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना १० हजार तर बारावीच्या विद्यार्थ्यांना १५ हजार रुपये अर्थसाहाय्य देण्यात येणार आहे. यासाठी महापालिकेत संपूर्ण माहिती देण्यात येईल.
‘एसडी सीड’तर्फे शिष्यवृत्ती योजना
गरजू, गुणवंत विद्यार्थ्यांनी त्यांचे शिक्षण निर्विघ्न पूर्ण करावे, स्वतःला सक्षम बनवावे या उद्देशाने माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्या मार्गदर्शनाखाली ही शिष्यवृत्ती योजना जाहीर करण्यात आली आहे. एसडी-सीड अंतर्गत जिल्ह्यातील दहावीच्या पुढील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती स्वरूपात मदत करण्यात येत आहे. यासाठी ऑगस्ट महिन्यात विद्यार्थ्यांना अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी लागते. नियमावलीत बसणाऱ्या विद्यार्थ्यांना लाभ मिळेल.
गार्डियन फाउंडेशन उचलणार जबाबदारी : ज्या विद्यार्थ्यांनी पालक गमावले त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी गार्डियन फाउंडेशनतर्फे उचलण्यात येते. दहावी, बारावी व त्यापुढील शिक्षणाचा संपूर्ण खर्च फाउंडेशनतर्फे करण्यात येतो. पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांनी नटवर मॉलच्या पहिल्या मजल्यावरील के. बी. वर्मा यांच्या कार्यालयात सकाळी ९ ते ११ व सायंकाळी ५ ते ७ या वेळेत संपर्क साधावा लागणार.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.