आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

50 हजारांचे प्रोत्साहन अनुदान:जळगाव जिल्ह्यात 86 हजारांहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यांची लेखापरीक्षकांमार्फत तपासणी

जळगाव3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील नियमित परतफेड करणाऱ्या ८८ हजार ८१५ कर्ज खात्यांची लेखापरीक्षकांमार्फत तपासणी करण्यात आली आहे.

शिंदे सरकारकडून अंमलबजावणी

कर्जमुक्ती योजनेंतर्गत महाविकास आघाडी सरकारच्या काळात थकबाकीदार शेतकऱ्यांना २ लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्ती देण्यात आली. त्याचप्रमाणे नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्राेत्साहन अनुदान देण्याचा निर्णयही घेण्यात आला. मात्र, कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी पूर्ण झाली तरी नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान मिळाले नव्हते. आता शिंदे-फडणवीस सरकारमध्येही हा निर्णय घेण्यात आला.

जिल्ह्यात ८७६ विविध कार्यकारी सोसायटी आहेत. या सोसायटींमध्ये एकूण कर्जखाती ८८ हजार ७९२ एवढी आहेत. प्रोत्साहन अनुदान योजनेचा लाभ देण्यासाठी लेखापरीक्षकांनी ७६० विविध कार्यकारी सोसायटींच्या माहितीची तपासणी केली. एकूण ८८ हजार ८१५ कर्जखात्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्याबाबत सहकार विभागातर्फे यापूर्वीच सरकारला माहिती पाठवण्यात आलेली आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क साधा

कर्जमुक्ती योजनेप्रमाणे प्रोत्साहन अनुदानासाठीही निकष राहणार आहेत .राज्य शासनाने सन २०१७-२०१८ तसेच २०१९-२०२० या आर्थिक वर्षात बँकेकडून घेतलेल्या पीक कर्जाची विहित मुदतीत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची सहकार विभागाकडून माहिती मागविली होती. या योजनेबाबत अधिक माहितीसाठी जिल्हा अग्रणी प्रबंधक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवई यांनी केले आहे.

शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा

जास्तीत जास्त पात्र शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक यांनी केले आहे. महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ६० हजार ४६० शेतकऱ्यांना ९१५ कोटी ७८ लाख रुपयांची कर्जमुक्ती देण्यात आलेली आहे. एकूण ९ हजार ६६७ शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळण्यास अपात्र ठरवण्यात आलेले आहे. आता पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान मिळणार आहे.

बातम्या आणखी आहेत...