आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यंदाही जळगावकरांची पर्यावरणपूरक शाडू मातीच्या मूर्तींना पसंती:आज सकाळी ११.०५ वाजेपासून रात्री १२ वाजेपर्यंत करा गणरायाची स्थापना

जळगाव3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

काेराेनाच्या दोन वर्षाच्या ब्रेकनंतर यंदा गणेशोत्सवाचा उत्साह दुपटीने संचारला असल्याने गणरायाचे आगमन दणक्यात होणार आहे. यंदा गणरायाचा मुक्काम दहा दिवसांचा असणार आहे. बुधवारी सकाळी ११.०५ वाजेपासून ते रात्र १२ वाजेपर्यंत बाप्पाची स्थापना करता येणार आहे. यंदा देखील भाविकांनी घरगुती गणेशासाठी शाडू मातीच्या गणरायांना पसंती दिली आहे.

बाजारात पर्यावरणपूरक शाडू मातीची गणेश मूर्ती एक फुटांपासून ते चार फुटांपर्यंत या प्रकारात ३०० रुपयांपासून बाजारात उपलब्ध आहेत. टॉवर चौक, नवीपेठ, बळीरामपेठ, प्रभात चौक, महाबळ परिसरासह राष्ट्रीय महामार्गावर गणपती मूर्ती विक्रीची शेकडो दुकाने थाटण्यात आली आहे. पूजा साहित्य, लाईटींग, डेकोरेशन साहित्यंासह फळे, मिठाईच्या दुकानांवर मंगळवारी ग्राहकांची गर्दी वाढली होती. दरम्यान, यंदा शासनाने मूर्तीची उंचीचे निर्बध हटविल्याने मंडळाचे उंच मूर्ती खरेदीवर भर आहे.

या ठिकाणी मिळणार शाडूच्या गणेशमूर्ती
टॉवर चौक, युनियन बँकेसमोर बँक स्ट्रिट नवीपेठ, ओक मंगल कार्यालयाज‌वळ बळीरामपेठ, कान्हा हाइटस श्रद्धा कॉलनी, बहिणाबाई उद्यान, महाराणा प्रताप चौक, खोटेनगर स्टॉप, गुजराल पेट्रोल पंप, भारतनगर दूध फेडरेशनजवळ.

यंदा बुधवारचा अनाेखा योग
बुधवार हा बुध ग्रहाचा वार, बुध हा बुद्धीचा दाता मानला जातो. गणेशाला बुद्धीचा अधिपती मानतात. बुधवार हा श्री गणेशाला समर्पित केलेला वार आहे. बुधवारी गणेशाची मनोभावे पूजा, आराधना केल्याने भक्तांची सर्व दुःख, संकटे दूर होतात असे मानले जाते. यंदा हा योग जुळून आला आहे.

अशी करा स्थापना
मूर्ती ठेवण्याची जागा सारवून पाट मांडून अक्षता पसरवा. त्यावर आसन ठेवून मूर्ती स्थापन करा. त्यानंतर द्विराचमन, प्राणायाम आदी केल्यावर ‘श्रीपरमेश्वप्रीत्यर्थ पार्थिवगणपतिपूजनमहं करिष्ये’ असा संकल्प म्हणून पाणी सोडा. कलश, शंख, घंटा, दीपचे पूजन करून गंध, अक्षता, पुष्पार्पण करा. गणपतीच्या नेत्रांना दूर्वांनी तुपाचा स्पर्श करावा, मूर्तीच्या हृदयाला उजव्या अंगठ्याने स्पर्श करून प्राणप्रतिष्ठेचे मंत्र म्हणावेत.

अशी करा तयारी : गणरायाच्या स्थापनेसाठी चौरंग, पाट ठेवा. पूजास्थानाच्या वर नारळ कळसात ठेवा. आंब्यांचे डहाळी, सुपाऱ्या, पाण्याने भरलेला तांब्या, पळी, पंचपात्र, ताम्हण, समई, जानवे, पत्री, शेंदूर, विड्याची पाने, सुपारी, नारळ, फळे, मोदक, मिठाई, पेढे व पूजा साहित्य घेऊन पूजेची पूर्वतयारी करा.

बातम्या आणखी आहेत...