आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Jalgaon
  • Institutions, Associations, Students Including Municipality Have Collected As Many As 13 Tons Of Nirmalya; Activities Conducted At The Lake Along With Immersion Procession Route| Marathi News

सामाजिक पुढाकार:मनपासह संस्था, संघटना, विद्यार्थ्यांनी तब्बल 13 टन निर्माल्य केले संकलन; विसर्जन मिरवणूक मार्गासह तलावावर राबवला उपक्रम

जळगाव16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

लाडक्या बाप्पाला शुक्रवारी गणेशभक्तांनी निरोप दिला. शहरातील मिरवणूक मार्गासह मेहरूण तलावावरील विसर्जन स्थळावर मनपाचा आराेग्य विभाग, धर्माधिकारी प्रतिष्ठान, पाच संस्था, तीन संघटना, शाळकरी विद्यार्थी यांनी दिवसभरात तब्बल १३ टन निर्माल्याचे संकलन केले. तर काही सामाजिक संस्थांनी जलसेवा, स्वागतकक्ष, मदत कक्ष, वैद्यकीय कक्षा बरोबरच तलावावर जीवरक्षक सेवा दिली. पीपल्स बँकेने पोलिस कर्मचाऱ्यांना फूड पॅकेटचे वाटप केले.

शिवतीर्थ मैदानापासून विसर्जन मिरवणुकांना सुरुवात झाली. सकाळी १० पासून सुरू झालेल्या मिरवणुका रात्री उशिरापर्यंत सुरू होत्या. तलावमार्गावर महापालिकेसह धर्माधिकारी प्रतिष्ठान संस्थेनेही निर्माल्य संकलनासाठी वाहनाचीही सुविधा उपलब्ध करून दिली हाेती. या ठिकाणीही पाच क्विंटलपेक्षा अधिक निर्माल्य संकलन झाल्याचे संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. वन्यजीव संरक्षण संस्थेतर्फे मेहरूण तलाव येथे जीवरक्षक बोटीसह २० जीवरक्षकांचे पथक सकाळी ९ वाजेपासून कार्यरत होते. १० सर्पमित्र, प्रथमोपचार तज्ज्ञ आणि निर्माल्य संकलनासाठी ३० स्वयंसेवक असे एकूण ६० कार्यकर्त्यांनी सेवा दिली. तसेच समर्पण संस्था, हरित सेना, युवाशक्ती फांउडेशन, जळगाव ब्लागर्स, सामाजिक वनीकरण व आपत्ती व्यवस्थापन यांनी निर्माल्या संकलनासाठी पुढाकार घेतला हाेता.

चार सर्प रेस्क्यू करत सुरक्षित अधिवासामध्ये साेडले
तलावाच्या चारही बाजूने टेहळणी करत जीवरक्षकांनी नागरिकांना धोक्याच्या सूचना देत जिल्हा प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन केले. ड्रोनद्वारे चौफेर नजर ठेवण्यात आली. सर्पमित्रांनी या भागातून चार साप रेस्क्यू करत सुरक्षित अधिवासात मुक्त केल्याची माहितीही वन्यजीव संस्थेचे अध्यक्ष बाळकृष्ण देवरे यांनी दिली. जीवरक्षक पथकात योगेश गालफाडे, अजिम काजी, नीलेश ढाके, राजेश सोनवणे, जगदीश बैरागी, ऋषी राजपूत, अमन गुजर, अरुण सपकाळे, चेतन भावसार, कृष्णा दुर्गे, हेमराज सपकाळे, दिनेश सपकाळे, रितेश भोई, रवींद्र भोई, प्रसाद सोनवणे,श्याम पाटील, प्रदीप शेळके, विनोद सोनवणे यांचा समावेश होता.

मॉकड्रीलने वेधून घेतले लक्ष
तलावात व्यक्ती बुडाल्याची माहिती मिळताच प्रशिक्षित जीवरक्षकांनी आपला जीव पणाला लावून बचावकार्य सुरू केले. जीवरक्षक बोट तत्काळ बुडणाऱ्या व्यक्तीपर्यंत पोहाेचली. यासह महापालिकेचे पथकही तत्पर झाले. लाइफ रिंग टाकून व्यक्तीला वाचवत काठावर आणले. यावेळी काठावरील पट्टीच्या पोहणाऱ्यांना थांबण्याचा इशारा देण्यात आला. हे मॉकड्रील असल्याचे सांगण्यात आल्यानंतर सुटकेचा श्वास सोडला.

पीपल्स बँकेने पोलिस कर्मचाऱ्यांना दिले फूड पॅकेट : दी जळगाव पीपल्स को-ऑप. बँकेतर्फे पोलिस बंधू भगिनींसाठी जेवणाचे पाकिटे वितरित केले. पॅकेटमध्ये पराठे, छोलेची भाजी, व्हेज बिर्यानी, गुलाब जामुन, समोसा, सलाद व एक लिटरची शुद्ध पाण्याची बाटली असे पॅकिंग करून देण्यात आले. पोलिस अधीक्षक डाॅ. प्रवीण मुंढे, जिल्हाधिकारी डाॅ. अभिजित राऊत, सहायक पोलिस अधीक्षक कुमार चिंथा, पोलिस निरीक्षक विजय ठाकूरवाड, बँकेचे अध्यक्ष अनिकेत पाटील, संचालक भालचंद्र पाटील, सुनील पाटील, रामेश्वर जाखेटे, प्रवीण खडके, ज्ञानेश्वर मोराणकर उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...