आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोरोनाच्या दुसऱ्या लाटे दरम्यान जिल्हा रुग्णालयात झालेल्या कोट्यवधी रूपयांच्या खरेदी व कामांत घोटाळा झाल्याचा आरोप शिवसेनेचे आमदार चिमणराव पाटील यांनी विधानसभेत केला आहे. या संपूर्ण गैरव्यवहाराची त्रयस्थ एजन्सीमार्फत चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणण्याची मागणी केली आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटे दरम्यान परिस्थिती हाताबाहेर गेली होती. साधन सामुग्री देखील कमी पडत होती. अशा परिस्थितीत डीपीडीसी असो की विविध विभागांच्या माध्यमातून सुमारे ४५ कोटींच्या निधीतून खरेदी व विविध कामे करण्यात आली होती. यात थर्मामीटर, पीपीई किट, व्हेंटिलेटरची खरेदी करण्यात आली होती. ज्या मापदंडानुसार व्हेंटिलेटरची मागणी नोंदवली होती त्यापेक्षा वेगळे व्हेंटीलेटर प्राप्त झाले होते. यात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याच्या तक्रारी देखिल झाल्या होत्या. यासंदर्भात आमदार चिमणराव पाटील यांनी देखील डीपीडीसीच्या बैठकीत तक्रार केली होती. त्यात त्यांचा विरोध नोंदवून मंजुरी देण्यात आली होती. व्हेंटीलेटर खरेदी घोटाळ्याचा मुद्दा आमदार पाटील यांनी बुधवारी विधानसभेत उपस्थित केला. जळगाव जिल्ह्यात कोरोना काळात करण्यात आलेली खरेदी व झालेली कामे निकृष्ठ दर्जाची असल्याचा आरोप आमदार पाटील यांनी केला. १५ ते २० ऑक्सिजन निर्मीती प्रकल्प उभे करण्याचा संकल्प करण्यात आला; परंतु एकही प्रकल्प सुरू नसून कोणत्याही प्रकल्पातून एक लिटर देखील ऑक्सिजन मिळत नसल्याची खंत व्यक्त केली. कोरोना काळात खरेदी व विविध कामांवर सुमारे ४५ कोटी रूपये खर्च झाले आहेत. त्या कामांमध्ये गैरव्यवहार करण्याचा प्रयत्न झाल्याचे आमदार पाटील यांनी विधानसभेत सांगितले.
अंजनीसह पद्मालय प्रकल्पासाठी निधीची केली मागणी
अंजनी धरणाचे काम पूर्ण झाले असून पाणी साठवणूक सुरू आहे; परंतु या पाण्याचा शेतीसाठी उपयोग होत नाही. तसेच पद्मालय प्रकल्पासाठी अडीचशे कोटी रूपये भूसंपादनावर खर्च झाले आहेत. १८ कोटींचा प्रकल्पावर ३०० कोटी खर्च झाले असून आता कोणत्याही गावाचे पुनर्वसन करायचे नाही. त्यामुळे सुधारीत प्रशासकीय मान्यता देऊन निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.