आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपा जागा सुचवणार:मेहरूण तलावाजवळ जैन उद्याेग समूह पाेलिस चाैकी बांधून देणार ; परिसरातील टारगटांचा बंदाेबस्त

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मेहरूण तलाव परिसरातील जाॅगिंग ट्रॅकवर गेल्या आठवड्यात एक मुलगा कार रेसिंगचा बळी ठरला. या पार्श्वभूमीवर हा परिसर ‘नाे पार्किंग झाेन’ करण्याच्या दृष्टीने गणेशाेत्सवानंतर प्रशासन विचार करून कार्यवाही करणार आहे. मात्र, असे असले तरी या ठिकाणी पाेलिस चाैकीसाठी जागा उपलब्ध करून देण्यात येईल, असे महापाैर जयश्री महाजन यांनी सांगितले. तर जैन उद्याेगसमूहातर्फे ही पाेलिस चाैकी उभारण्याचा शब्द अशाेक जैन यांनी दिला आहे. जिल्हा पाेलिस अधीक्षक डाॅ. प्रवीण मुंढे यांनीही येथे पाेलिसांची नेमणूक करणार असल्याचे सांगितले.

मेहरूण तलावाच्या जाॅगिंग ट्रॅकवर गेल्या आठवड्यात रविवारी कार रेसिंगमुळे विक्रांत संताेष मिश्रा या अकरावर्षीय बालकाचा जीव गेला. त्याच्या मृत्यूस कारणीभूत अल्पवयीन मुलाच्या बापाला अटक करण्यासह हा परिसर नाे पार्किंग झाेन करावा या मागणीसाठी शुक्रवारी समाज माध्यमावरील डायमंड‌्स ग्रुपच्या सदस्यांसह नागरिकांनी एकदिवसीय धरणे आंदाेलन केले. जिल्हाधिकारी अभिजित राऊत व पाेलिस अधीक्षक डाॅ. प्रवीण मुंढे यांनी आंदाेलक शिष्टमंडळाशी चर्चा केली. त्यात मागण्यांवर सकारात्मक विचार केला जाईल असे आश्वासन देण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत झालेल्या या आंदोलनात स्व. विक्रांतचे वडील संतोष मिश्रा, महापौर जयश्री महाजन, माजी महापौर सीमा भोळे, डायमंड्स ग्रुपचे सदस्य व जळगावकर सहभागी झाले. जिल्हा सरकारी वकील केतन ढाके, प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही व एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रताप शिकारे यांनी भेट देऊन आंदोलकांची बाजू समजून घेतली.

चर्चेतून या सूचना आल्या पुढे : मेहरूण तलावलगतचा रस्ता हा पादचारी मार्ग जाहीर करून तेथे नो व्हेइकल झोन करावा. तलावाकडे वाहनांना बंदी करावी. तेथील वसाहतींचे जोड रस्ते बंद करावेत. तेथील भूखंड मालकांना पर्यायी रस्ते वापरासाठी सक्ती करावी (मेहरूण

तलाव भोवती रस्ता आहे असे शहराच्या कोणत्याही विकास आराखड्यात दिसत नाही. पोलिस अधिकारी, आरटीओ अधिकारी आणि काही मान्यवरांचा व्हाॅट‌्सअॅप ग्रुप करावा. त्यात धूम चालक, रेसवाले यांचे फोटो व नंबर प्लेट शेअर करावी. जे अल्पवयीन मुले दुचाकी व चारचाकी चालवतात त्यांना पकडून त्यांच्या पालकांना चौकात उठबशा काढायला लावाव्यात. नो हेल्मेट नो ड्रायव्हिंग अभियान राबवावे. गणेशोत्सवानंतर धूम स्टाइल चालकांना तीन दिवस इशारा द्यावा. चौथ्या दिवसांपासून ‘हवा छोडो अभियान’ आणि गुंडागर्दीवर आले तर ‘दे झोडपा करेक्ट कार्यक्रम’ करावा.

आंदाेलनात यांचा हाेता सहभाग : आंदोलन संयोजन ललित कोल्हे, सरिता कोल्हे, सुनील पाटील, किशोर पाटील, अमित जगताप, विराज कावडीया यांनी केले. नंदुकुमार अडवाणी, विष्णू भंगाळे, सरिता माळी, गजानन मालपुरे, शंभू पाटील, श्रीकांत खटोड, सचिन नारळे, कैलास सोनवणे, शिरीष बर्वे, जितेंद्र मुंदडा, अमर जैन, विजय लोहार, नितीन बरडे, डॉ. अनिल पाटील, डॉ. जितेंद्र कोल्हे, डॉ. स्नेहल फेगडे, श्रीकांत खटोड, अभिषेक पाटील, अशोक लाड आदींनी सूचना मांडल्या.

बातम्या आणखी आहेत...