आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावमध्ये 122 ग्रामपंचायतींसाठी मतदान सुरू:भाजप-शिंदे गटाकडून 70 टक्के, तर मविआकडून 75 टक्के ग्रामपंचायतींवर विजयाचा दावा

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव जिल्ह्यातील १४० पैकी १८ ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली. उर्वरित १२२ ग्रामपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया सुरू आहे. मात्र, मतदानापूर्वीच भाजप-शिंदे गटाकडून ७० टक्के ग्रामपंचायती ताब्यात असतील, असा दावा करण्यात आला आहे. हा दावा खोडून काढत ७५ टक्के ग्रामपंचायतींमध्ये महाविकास आघाडीने विजयाचे गणित मांडले आहे.

मंत्री गिरीश महाजन म्हणाले...

ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन म्हणाले, १४० पैकी ६० ते ७० टक्के ग्रामपंचायती ताब्यात राहतील. जवळपास ८० ते ९० ग्रामपंचायती आम्ही १०० टक्के जिंकू. निकाल लागल्यावर कळेल. सरपंचच सांगतील, आम्ही कोणत्या पक्षाचे आहोत. मागच्या वेळेस किती ग्रामपंचायती आमच्याकडे होत्या हे मला सांगता येणार नाही.

निवडून आलेल्यांनी वाजत गाजत यावे

गिरीश महाजन म्हणाले, जामनेर मतदार संघातील १२ पैकी ११ ग्रामपंचायतींमध्ये आपसातच भाजप कार्यकर्त्यांमध्ये लढत आहे. मैत्रीपूर्ण लढती आहेत. त्याबाबत माझी अतिशय न्यूट्रल भूमिका आहे. निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर जे निवडून येतील, त्यांनी वाजत गाजत यावे, असे कार्यकर्त्यांना सांगितले आहे. आमदार म्हणून ग्रामपंचायत प्रचाराला जात नाही. जे कार्यकर्ते निवडून येतील, त्यांचे स्वागत.

शिंदे गटाचा दावा

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगाव तालुक्यातील सावखेडा या बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायतीवर शिंदे गटाचा दावा केला. काही ग्रामपंचायतींमध्ये दोन्ही पॅनलमध्ये कार्यकर्ते उमेदवारी करीत आहेत. मागच्या वेळेस ६६ ग्रामपंचायती शिवसेनेकडे होत्या. आम्ही आता इकडे आलो. आम्हीच शिवसेना आहोत. बाळासाहेबांची शिवसेना आहे. उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडे एक तरी ग्रामपंचायत आहे काय? असा प्रश्न गुलाबराव पाटीलांनी उपस्थित केला.

सरकारवरील रोष निवडणुकांत दिसेल

ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. सत्तेत असल्याने भाजप-शिंदे गट काहीही दावे करु शकतात. त्यांच्या दाव्यांना अर्थ नाही. ग्रामीण भागात महागाई, बेरोजगार, वीजेचा प्रश्न अशा अनेक प्रश्नांनी जनता त्रस्त आहे. सरकारविषयी रोष आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेना या महाविकास आघाडीच्या ७५ टक्के ग्रामपंचायती ताब्यात असतील, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ​​​​​​अ‌ॅड. रवींद्र पाटील यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...