आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्घृण हत्या:जळगाव हत्याकांडातील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार? तपासासाठी एसआयटीची स्थापना

जळगाव2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जळगावात चार अल्पवयीन भावंडांची निर्घृण हत्या, शेतात मृतदेह सापडल्याने हादरला रावेर तालुका

आई-वडील मध्यप्रदेशातील आपल्या मुळगावी नातेवाईकाच्या दशक्रियाविधीसाठी गेले असता रात्री शेतातील घरात झोपलेल्या आदिवासी कुटुंबातील चार अल्पवयीन बहिण-भावंडांचा (दोन मुली व दोन मुले) कुऱ्हाडीने वार करून निघृण खून केल्याची थरारक घटना शुक्रवारी सकाळी आठ वाजता उघडकीस आली. रावेर शहरापासून काही अंतरावर असलेल्या बोरखेडा रस्त्यावरील केळीच्या शेतातील एका पत्र्याच्या घरात ही घटना शुक्रवारी रात्री घडली. अत्यंत निरागस अशा या बालकांचा खून का केला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र चौघांपैकी एका १३ वर्षाच्या मुलीवर अत्याचार करण्यात आला व त्यानंतर चाैघा बालकांची हत्या करण्यात अाल्याचा संशय असून तसा आरोप माजी मंत्री गिरीश महाजन व रावेरच्या खासदार रक्षा खडसे यांनी केला आहे. या घटनेच्या तपासासाठी एसआयटी (स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम)स्थापन करण्यात आली असून त्यात आयपीएस अधिकारी कुमार चिंथा यांच्यासह चार पोलिस निरीक्षक आहेत.

सविता मैताब भिलाला (वय १३), राहुल (वय ११), अनिल (वय ८) व सुमन (वय ६, सर्व मूळ रा. गढी, ता.बिस्टन, जि.खरगोन, मध्यप्रदेश) अशी खून झालेल्या भावंडांची नावे आहेत. या घटनेची दखल घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुन्हेगारांना तत्काळ अटक करावी, अशा सूचना पोलिस अधीक्षकांना दिल्या आहेत. दरम्यान, नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर यांनी शुक्रवारी दुपारी घटनास्थळी भेट दिली व अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

आठ वर्षांपासून शेतात वास्तव्य, सालगडी म्हणून कार्यरत

रावेर येथील शेतकरी शेख मुस्तफा शेख यासीन यांचे बोरखेडा रस्त्यावर शेत आहे. त्यांच्या शेतात गेल्या आठ वर्षांपासून गढी (ता.बिस्टन, जि.खरगोन, मध्यप्रदेश) येथील मैताब गुलाब भिलाला हे पत्नी व पाच मुलांसह सालगडी म्हणून कामाला आहेत. शेतात असलेल्या पत्र्याच्या घरात भिलाला कुटुंबीय वास्तव्य करते. त्यांना संजय (वय १६), सविता, राहुल, अनिल व सुमन अशी पाच मुले होती. गढी येथील एका नातेवाईकांचे निधन झाल्याने दशक्रिया विधीच्या कार्यक्रमासाठी मैताब भिलाला त्यांची पत्नी व मोठा मुलगा संजय असे तिघेजण गुरुवारी सकाळी दुचाकीने गढी येथे गेले होते. तर सविता, राहुल, अनिल व सुमन ही भावंडे घरीच होती.

शेत मालकाने दरवाजा ढकलला अन् चौघे दिसले रक्ताच्या थारोळ्यात

शेतमालक शेख मुस्तफा हे शुक्रवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास शेतात पोहोचले. त्यांना भिलाला यांच्या घराचा दरवाजा बंद असलेला दिसला. भिलाला कुटुंबीयांची शेळी दररोज रात्री ते घरात तर सकाळी घराबाहेर बांधत असत. परंतू सकाळी मुस्तफा यांना शेळी घराबाहेर बांधलेली दिसली नाही, तसेच घराचा दरवाजा बंद असलेला दिसला. त्यामुळे त्यांनी घरातील मुलांना आवाज दिला. मात्र, प्रतिसाद न मिळाल्याने मुस्तफा यांनी दरवाजा ढकलून पाहिला. त्यांना चौघे बहिणभाऊ रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. त्यामुळे मुस्तफा यांनी तत्काळ पोलिस ठाणे गाठून पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी सहकाऱ्यांसह तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. या घटनेची माहिती वाऱ्याच्या वेगाने तालुक्यात पसरली. त्यामुळे घटनास्थळी गर्दी उसळली होती.

जंजीर श्वानाने दाखवला मारेकऱ्यांचा मार्ग

गुन्ह्याच्या तपासाच्या दृष्टीने जळगाव येथून ठसेतज्ञ, श्वानपथक व फॉरेन्सिक प्रयोगशाळेच्या पथकास पाचारण करण्यात आले होते. ठसेतज्ञांनी घटनास्थळी पाहणी करत विविध ठिकाणचे ठसे घेतले. तर पथकातील जंजीर नावाच्या श्वानाने घटनास्थळापासून रावेर-बऱ्हाणपूर रस्त्याच्या दिशेने मार्ग दाखवला.

एसपींची घटनास्थळी भेट

घटनेची माहिती मिळताच नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. तपासाच्या दृष्टीने पोलिस अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, डीवायएसपी नरेंद्र पिंगळे, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक बापू रोहोम, सहायक पोलिस निरीक्षक शीतलकुमार नाईक, निंभोरा येथील सहायक निरीक्षक महेश जानकर, उपनिरीक्षक मनोज वाघमारे उपस्थित होते.

एसआयटीद्वारे गुन्ह्याचा तपास, अत्याचार झाल्याचा संशय

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंडे यांनी प्रताप दिघावकर यांच्या आदेशावरून स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम (एसआयटी)स्थापन केली. या पथकात आयपीएस कुमार चिंथा यांच्यासह चार पोलिस निरीक्षक आहेत. अत्यंत निरागस, निष्पाप अशा या चौघा बालकांचा खून का केला? कुणी केला? या मागील कारणांचा शोध पोलीस घेत आहेत. एका मुलीवर अत्याचार करुन नंतर चौघांचा खून केल्याचा पोलीसांना संशय आहे. त्यादृष्टीने तपास सुरु आहे. शवविच्छेदन अहवालात अत्याचार केला आहे की नाही, हे समोर येईल.

घटनास्थळावरून कुऱ्हाड व दोन दारुच्या बाटल्या जप्त

घटनास्थळी कुऱ्हाड व दोन दारुच्या रिकाम्या बाटल्या पोलिसांना आढळून आल्या असून पोलिसांनी त्या जप्त केल्या आहेत. या कुऱ्हाडीनेच चौघा बहिणभावंडांचा खून करण्यात आला असावा असा पोलिसांचा अंदाज आहे. घटनास्थळावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

दोघे यशवंत विद्यालयाचे विद्यार्थी

घटनेत खून झालेली सविता व आईवडिलांसोबत गावाला गेल्याने घटनेतून बचावलेला संजय हा रावेरातील यशवंत विद्यालयाचे विद्यार्थी आहेत. सविता ही इयत्ता आठवीत शिकत होती, तर संजय हा अकरावीत शिकत आहे.

आईवडिलांनी केला आक्रोश

घटनेची माहिती मृतांच्या काकाने त्यांच्या आईवडिलांना व नातेवाईकांना कळवली. त्यामुळे शुक्रवारी सकाळी ११.१५ वाजता नातेवाईक घटनास्थळी पोहचले. गाडीतून उतरताच सर्वांनी हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश केला.

मृतदेह जळगावला रवाना

या घटनेची सखोल चौकशी करण्याच्या दृष्टीने चौघे मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलेले असून तज्ञ डॉक्टरांकडून इनकामेरा शवविच्छेदन होणार असल्याची माहिती एसपी डॉ. प्रवीण मुंडे यांनी दिली.

आमदार चंद्रकांत पाटील यांची भेट

आमदार चंद्रकांत पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पोलीस करीत असलेल्या तपासाच्या कामाबाबत समाधान व्यक्त केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या घटनेची दखल घेतली असून घटनेचा तात्काळ तपास करून आरोपीला अटक करण्याचे आदेश दिले असल्याचे त्यांनी सांगितले.

निळे निशाण संघटनेची माणुसकी

निळे निशाण संघटनेचे अध्यक्ष आनंद बाविस्कर यांच्यासह राजू सावर्णे व कार्यकर्त्यांनी घटनास्थळी भेट देऊन भिलाला कुटुंबीयांचे सांत्वन केले. तसेच या कुटुंबीयातील लहान मुलांसाठी नाश्ता व पाणीजारची व्यवस्था करून दिली होती.

लवकरच आरोपींना अटक करणार

या घटनेचा सखोल तपास एसआयटीद्वारे करण्यात येत असून यासाठी वेगवेगळी पथके तयार करण्यात आली आहेत. सर्व बाजूंनी घटनेचा तपास हे पथक करतील. लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल. या घटनेतील कुटुंबीयांच्या सुरक्षिततेलाही तेवढेच प्राधान्य असेल. डॉ. प्रवीण मुंडे, जिल्हा पोलीस अधीक्षक, जळगाव

बातम्या आणखी आहेत...