आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावात 2 दुचाकीचा अपघात:1 तरुण ठार तर 3 जण जखमी; कानळदा रोडवरील घटना

जळगाव20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कामावरुन घरी जात असलेल्या एका तरुणाचा दुचाकी अपघातात मृत्यू झाला. तर तीन जण गंभीर जखमी झाले. कानळदा रोडवरील के.सी.पार्क जवळ 28 फेब्रुवारी रोजी रात्री 11.30 वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. दुचाकी समोरासमोर धडकल्याने हा अपघात झाला. जखमींवर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

गणेश सोमा सपकाळे (वय 32, रा. आमोदा खुर्द, ता. जळगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील आमोदा खुर्द गावात गणेश सपकाळे हा डंपरचालक म्हणून काम करीत होता. नेहमी प्रमाणे 28 रोजी तो आसोदा येथे मालकाकडे कामावर गेला. रात्री गावातील मित्र समाधान प्रल्हाद बाविस्कर याच्यासोबत दुचाकीने आमोदा खुर्द गावाकडे निघाले होते. जळगाव शहरापासून जवळ असलेल्या कानळदा रोडवरील केसी पार्क येथे त्यांच्या दुचाकीस समोरुन येणाऱ्या भरधाव दुचाकीने धडक दिली. या अपघातात गणेश सपकाळे याचा जागी मृत्यू झाला. तर सोबत असलेला समाधान बाविस्कर आणि समोरील दुचाकीवरील जितेंद्र एकनाथ चौधरी व अमोल प्रकाश विसपूते (रा. कांचननगर) हे तिघेजण गंभीर जखमी झाले.

या अपघातात दोन्ही दुचाकींचे मोठ्या प्रमाणात नुकसानही झाले आहे. मृत गणेशचा मृतदेह रात्रीच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणला होता. तर तीघे जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले. बुधवारी सकाळी शवविच्छेदन करुन मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. मृत गणेशच्या पश्चात आई उषा, वडील सोमा गोविंदा सपकाळे, लहान भाऊ गोपाल, पत्नी छाया, मुलगा जयेश आणि मुलगी असा परिवार आहे. या घटनेबाबत शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रवींद्र सोनार तपास करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...