आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
जळगावच्या शासकीय महिला वसतीगृहात अत्याचाराची घटना घडलीच नाही. ज्या दैनिकाने अशा स्वरुपाची बातमी दिली त्या दैनिक आणि बातमीदारावर कारवाई केली जाणार आहे असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सभागृहात गुरुवारी स्पष्ट केले आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे एका प्रसिद्ध दैनिकाने जळगावच्या एका शासकीय महिला वसतीगृहात पोलिस आणि इतरांनी महिलांना स्ट्रिप डान्स करायला लावला अशी बातमी दिली होती. ती बातमी चुकीची होती, प्रत्यक्षात तशी घटना घडलीच नाही असे गृहमंत्र्यांनी सांगितले आहे.
वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांच्या टीमने तपास केला
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिलेल्या विधिमंडळात दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात 6 वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांची एक चौकशी समिती नेमण्यात आली होती. या प्रकरणाची चौकशी केली असता त्या ठिकाणी 17 महिला राहत होत्या. त्या ठिकाणी 41 जणांच्या साक्षी घेण्यात आल्या. त्यात अत्याचाराची घटना घडलीच नाही असे समोर आले आहे. ज्या महिलेने तक्रार केली त्या महिलेच्या पतीने वेळोवेळी आपली पत्नी दिवाळखोर असून तिच्यावर उपचाराची विनंती केली होती.
नेमके काय घडले?
20 फेब्रुवारी रोजी तेथील महिलांनी मनोरंजनासाठी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले होते. त्यात गरबा आणि कविता सादरीकरणासह इतर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात गरबा करणाऱ्या एका महिलेने लांब असा झगा घातला होता. महिलेला त्या झग्याचा त्रास होऊ लागला. त्यामुळे, तिने तो काढून ठेवला. तपास करणाऱ्या महिला अधिकाऱ्यांनी तेथील नोंदी आणि रेजिस्टर बुकसह संपूर्ण तपासणी केली. त्या ठिकाणी कुठलाही पोलिस अधिकारी जाऊ शकत नाही आणि गेला सुद्धा नाही. कारण ते वसतीगृह महिलांचे आहे.
रेकॉर्डिंग केल्याचा दावा खोटा
या ठिकाणी कुठलेही कॅमेरे नव्हते. कुणीही त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड केलेला नाही. तरीही महिलांना नग्न करून नाचण्यास भाग पाडले असा आरोप करण्यात आला. पोलिसांनी व्हिडिओ काढला अशी बातमी आली. त्यामध्ये कुठलेही तथ्य नाही. तशा स्वरुपाचा अहवाल महिला अधिकाऱ्यांनी तयार केला आहे.
गृहमंत्री बोलत असताना मध्येच भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी एक प्रश्न विचारला, की कोरोनाच्या काळामध्ये अशा प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्याची परवानगी कुणी दिली? त्यावर उत्तर देताना 17 महिला होत्या. त्यांना कविता सादर करणे किंवा कार्यक्रम आयोजित न करू देणे असा कुठलाही नियम नाही असे अनिल देशमुख म्हणाले.
त्यानंतर भाजपकडून आणखी एक नेते चंद्रकात पाटील यांनी प्रश्न विचारला की त्या ठिकाणी असलेल्या महिलांपैकी काही अल्पवयीन आहेत. आणि कथितरित्या या महिला गर्भवती होत्या अशी माहिती समोर आली होती. ही माहिती खरी आहे का? त्यात उत्तर देताना, वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांनी तपास केला असता अशा स्वरुपाचे वृत्त चुकीचे आहेत. सोबतच हे महिलांचे वसतीगृह होते मुलींचे नाही असे गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले.
संबंधित दैनिक, बातमीदारावर कारवाई होणार
दरम्यान, नाना पटोले यांनी विचारलेल्या एका प्रश्नावर बोलताना चुकीची बातमी देणाऱ्या संबंधित वृत्तपत्र आणि बातमीदारावर कारवाई केली जाईल. त्या दैनिकाने बातमीची शहनिशा न करता ती तशीच छापली होती असेही गृहमंत्री म्हणाले आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.