आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजळगाव भारतीय जनता पक्षाच्या जम्बो प्रदेश कार्यकारिणीच्या घोषणेनंतर जिल्ह्यात दोन ऐवजी आता तीन जिल्हाध्यक्षांची नेमणूक होण्याचे वेध स्थानिक कार्यकर्त्यांना लागले आहेत. मात्र, पक्षाची वाढलेली कामे आणि त्यांचा काॅर्पोरेट पद्धतीने वरून होत असलेला पाठपुरावा, त्याला द्यावी लागणारी आर्थिक जोड लक्षात घेऊन शहर आणि ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारायला फारसे कोणी तयार नसल्याचे सांगण्यात येते आहे.
ज्यांनी ही जबाबदारी उत्साहाने स्वीकारली असती, वेळ आणि पैसाही दिला असता त्या प्रमुख इच्छुकांची प्रदेश कार्यकारिणीत वर्णी लावली गेल्यामुळे आता नवे चेहरे समोर आणण्याशिवाय पर्याय राहिलेला दिसत नाही. जळगाव जिल्ह्यात महानगर जिल्हाध्यक्ष, रावेर लोकसभा जिल्हाध्यक्ष आणि जळगाव लोकसभा जिल्हाध्यक्ष असे तीन जिल्हाध्यक्ष या वेळी पहिल्यांदाच नेमले जातील, असे सांगण्यात येते आहे.
आतापर्यंत महानगर जिल्हाध्यक्ष आणि ग्रामीण जिल्हाध्यक्ष अशी दोनच पदे होती. त्या पदांवर ज्यांना संधी दिली जाईल असे वाटत होते. त्यात महानगरातून डाॅ. राध्येशाम चौधरी यांना प्रदेश कार्यकारिणी सदस्य व ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदासाठी ज्या इच्छुक असल्याचे सांगितले जात होते त्या माजी आमदार स्मिता वाघ व अजय भाेळे या दोघांनाही प्रदेश कार्यकारिणीत उपाध्यक्ष आणि सचिव करण्यात आले आहे.
शहराचे आमदार सुरेश भोळे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. पण यापुढे आमदारांना संघटनात्मक कामांत अडकवायचे नाही, असा निर्णय झाल्याचे सांगण्यात येते आहे. त्यामुळे आमदार भोळे हे त्यांच्या मतदारसंघाचे समन्वयक म्हणून नेमले जाऊ शकतात. मग महानगराध्यक्ष कोण, याबाबत नुसतेच तर्क केले जात आहेत.
कार्यकर्त्यांत उत्सुकता वाढत चालली
आगामी काळात पक्षासाठी पूर्ण वेळ देणारी, संघटनात्मक आणि राजकीय अनुभव असलेली, पक्षामार्फत हाेणारे कार्यक्रम प्रभावीपणे राबवण्यासाठी आर्थिक पाठबळ असलेली व्यक्तीच या पदांवर येईल, हे निश्चित. कोण कोण या जबाबदाऱ्या स्वीकारते, या विषयी कार्यकर्त्यांत उत्सुकता अाहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.