आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना थांबेना:एरंडोल हादरले! कोरोनामुळे 10 जणांचा मृत्यू, चोपडा तालुक्यातही चार बाधित रुग्ण दगावले

पाडळसरेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • दुसऱ्या लाटेत एकाच दिवसातील बळींचा उच्चांक, आता नियमांचे पालन अत्यावश्यक

विटनेर (ता.चोपडा) येथील मुख्याध्यापक नरेंद्र मदने (वय ४४) यांचे १८ रोजी कोरोनामुळे निधन झाले. त्यापूर्वी त्यांचे वडील तथा साळवा (ता.धरणगाव) येथील निवृत्त शिक्षक हिंमतराव मदने (वय ७३) यांचे ७ रोजी कोरोनामुळे उपचारादरम्यान निधन झाले होते. दोघे अमळनेरातील आर.के.नगर येथील रहिवासी होते. अवघ्या ११ दिवसांच्या अंतरात कोरोनामुळे पिता-पुत्र दगावल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

नरेंद्र मदने हे विटनेर येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक होते. ते मूळचे वडगाव येथील रहिवासी आहेत त्यांचे १८ रोजी कोरोनामुळे उपचारादरम्यान औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात निधन झाले. त्यांनी पारोळा तालुक्यातील दगडी सबगव्हाण येथील शाळेत सेवा केली होती. त्यांचे वडील हिंमतराव पोपट मदने हे साळवा येथील माध्यमिक विद्यालयातून सेवानिवृत्त झाले होते. त्यांचेही ७ एप्रिलला कोरोनामुळे निधन झाले. नरेंद्र मदने हे विद्यार्थीप्रिय शिक्षक होते. ते उपशिक्षणाधिकारी पदाची परीक्षा उत्तीर्ण होते. नरेंद्र यांच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी, दोन मुले, बहीण असा परिवार आहे.

चोपड्यात चार रुग्णांचा मृत्यू, नवे ११८ बाधित
चोपडा | तालुक्यात सोमवारी नवे ११८ बाधित रुग्ण आढळले, तर चार बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. तालुक्यातील ग्रामीण भागातील चहार्डी येथे १४, कुरवेल-१०, देवगाव-८, वर्डी-१२, अडावद-७, लासूर-५, गोरगावले बुद्रूक व सत्रासेन येथे प्रत्येकी ४ तसेच गणपूर, धानोरा, गरताड येथे प्रत्येकी तीन, हातेड बुद्रूक, वेले, विचखेडा, अकुलखेडा, विषणापूर येथे प्रत्येकी दोन तर चोपडा शहरातील महालक्ष्मी नगर, सुंदरगढी, आदर्श नगर, शारदानगर या भागात कोरोनाचे रुग्ण आढळले. तालुक्यातील सोमवारी चार रुग्ण दगावले, त्यात मोहरद, वर्डी, अडावद व धानोरा या गावांमधील प्रत्येकी एका मृताचा समावेश आहे.

पोलिस पाटलाचा कोरोनाने मृत्यू
मृतांमध्ये एरंडोल शहरातील पाच जणांचा समावेश आहे. त्यात ६१, ४९ वर्षीय महिला, तर ७८, ७०, ४८ वर्षीय तीन पुरुषांचा समावेश आहे. तर ग्रामीण भागात भातखेडे येथे ६० वर्षीय महिला, रवंजे येथील ५२ वर्षीय महिला, खडके बुद्रूक येथील ७७ वर्षीय महिला, धारागिर येथील ६० वर्षीय पुरूष, हनुमंतखेडे येथील ५४ वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. हनुमंतखेडेसिम येथील पोलिस पाटील सुनील पाटील यांचाही कोरोनामुळे सोमवारी मृत्यू झाला.

कोरोनाने गटशिक्षणाधिकाऱ्यांचा मुलगा दगावला
धरणगाव येथील गटशिक्षणाधिकारी अशोक बिऱ्हाडे यांचा २७ वर्षांचा मुलगा कुणाल बिऱ्हाडे याचा कोरोनाने सोमवार, १९ रोजी बळी घेतला. गेल्या काही दिवसांपूर्वी कुणाल हा कोरोना पॉझिटिव्ह आला होता. त्याच्यावर अमळनेरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. काही इंजेक्शनांमुळे मेंदूला दुखापत झाली. काही दिवस तेथे उपचार केल्यानंतर जळगावात एका मेंदूच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे ऑपरेशनही करण्यात आले. त्यानंतरही कुणालच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. अखेर शर्थीचे प्रयत्न केल्यानंतरही, सोमवार, १९ रोजी सकाळी त्याचा मृत्यू झाला. अमळनेर या मूळ गावी कुणालवर दुपारी ३ वाजता अत्यंत शाेकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. कुणाल हा एमएस्सी झाला होता. त्याने संशोधनात करिअर करण्याचे ठरवले होते. त्याच्या मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे.

११ दिवसांच्या अंतराने शिक्षक पिता-पुत्राचा कोरोनामुळे मृत्यू
शहरासह ग्रामीण भागात सोमवारी कोरोनामुळे १० जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये शहरातील चार ग्रामीण भागातील सहा जणांचा समावेश आहे. त्यामुळे तालुक्यातील कोरोनाबळींची संख्या १७३ झाली आहे. तालुक्यात प्रथमच कोरोनाने २४ तासांत १० बळी घेतले. त्यामुळे आरोग्य यंत्रणा हादरली आहे. चोपडा तालुक्यातही सोमवारी चार बाधित रुग्णांचा मृत्यू झाला.
तालुक्यात कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. प्रशासनाने नियम पाळण्याचे आवाहन करूनदेखील नागरिकांचे दुर्लक्ष कायम आहे. त्यामुळे सोमवारी तालुक्यात कोरोनाबळींची विस्फोट झाला. सोमवारी तालुक्यात कोरोनाचे ४६ नवे रुग्ण आढळले. त्यात शहरातील व ग्रामीण भागातील प्रत्येकी २३ रुग्णांचा समावेश होता. त्यामुळे तालुक्यातील कोरोनाची रुग्णसंख्या ५ हजार ९४० झाली, त्यापैकी ५ हजार १९९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर ६१३ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत.

बातम्या आणखी आहेत...