आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

बेजबाबदारपणाचा कळस:पीपीई किटशिवायच मृतदेह नातलगांच्या ताब्यात, शववाहिका चालकही किटविनाच

जळगाव ( गणेश सुरसे )2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्मशानभूमीत पोहोचल्यावर तिथे महापालिका कर्मचारी असूनही शववाहिकेतून शव उचलण्याचे काम मृताच्या नातलगांनाच करावे लागले.
  • जळगाव जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या का वाढत चालली आहे याचा ढळढळीत पुरावा

जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने का वाढत आहेॽ या प्रश्नाचे उत्तर देणारी वस्तुस्थिती आज एका बाधिताच्या मृतदेहावर अंत्यसंस्काराची प्रक्रिया पाहताना समोर आली. मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठीचे नियम कठोर असले तरी त्यांच्या अंमलबजावणीत मात्र कमालीचा बेजबाबदारपणा होत असून पीपीई किट परिधान न केलेल्या मृताच्या नातलगांना थेट मृतदेह सोपवण्यात येत आहेत. शववाहिकेच्या चालकालाही पीपीई किटविनाच या मृतदेहांची वाहतूक करावी लागत आहे. मंगळवारी सकाळी घडलेला हा प्रकार शासनाने अधिग्रहित केलेल्या डाॅ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयाशी संबंधित आहे. अमळनेर येथील एक कोरोनाबाधित रुग्णाचे निधन झाल्यानंतर त्याचा मृतदेह थेट त्याच्या मुलांकडे सोपवण्यात आला. ही मुले मजुरी करतात आणि एक वेळच्या जेवणाचीही तरतूद त्यांच्याकडे नाही, अशी त्यांची परिस्थिती आहे. त्यांना पीपीई किट न देताच मृतदेह त्यांच्या ताब्यात देण्यात आला. तो शववाहिकेत ठेवण्यापासून स्मशानभूमीत पोहोचल्यावर उतरवण्यापर्यंतचे काम त्यांनीच केले.

पीपीई किट चितेवरच जाळले

स्मशानभूमीत उपस्थित महापालिकेच्या दोन कर्मचाऱ्यांनी शववाहिका आल्यावर पीपीई किट घातले. त्यानंतर नातलगांच्या मदतीने चिता रचून ती पेटवली. शेवटी ते किट उतरवून चितेवर फेकले.

‘रुग्णांना विष देऊन मारून टाका’

गेल्या १२ दिवसांपासून माझ्या वडिलांवर उपचार सुरू होते. त्या काळात आम्ही अत्यंत वाईट अनुभव घेतले आहेत. आता आमच्या गावात जर कोणी आजारी पडले तर त्यांना तेथेच विष देऊन मारून टाका; पण जळगावात उपचारासाठी आणू नका, असे आम्ही सांगणार आहोत. इथे रुग्णांचे तर हाल केले जातातच; पण मेल्यानंतर त्यांच्या मृतदेहाचीदेखील विटंबना केली जात आहे. - मृत कोरोनाबाधिताचा मुलगा

हातच्या काकणाला आरसा कशाला...

जिल्ह्यात आतापर्यंत १७६ कोराेनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. बाधितांची संख्या अडीच हजारांच्या घरात आहे. हे घडण्याचे कारण रुग्णालय आणि महापालिकेचा असा बेजबाबदार आणि गलथान कारभार आहे, हे सांगायला आता कोणा तज्ज्ञाची गरज राहिलेली नाही.

शास्त्रीय पद्धतीलाच रोज देताहेत अग्निडाग

वास्तविक वापरलेले किट नष्ट करण्याची एक शास्त्रीय पद्धत आहे. किट परिधान करणे आणि ते अंगावरून उतरवणे यासाठीही स्वतंत्र जागेची तरतूद असावी लागते. तेवढी काळजी घेणे तर दूरच, ते किट चितेवरच जाळण्याचा धोकादायक प्रकार सुरू आहे. काेरोनाबाधित व्यक्तीच्या अंत्यसंस्काराच्या वेळी स्मशानभूमीत नातलगांना परवानगी नसते; पण या वेळी मृताच्या पत्नीसह त्यांचे नातलगदेखील स्मशानभूमीत हजर होते. कोणत्याच पातळीवर काहीही काळजी घ्यायची नाही, असा निर्धारच महापालिकेच्या यंत्रणेनेही केलेला दिसतो. रुग्णालयांचे प्रशासनही त्यांना मदतच करते आहे.

औपचारिकताच..

कोरोनाबाधिताचे शव स्मशानभूमीत आणले गेले त्या वेळी तिथे महापालिकेचा हा कर्मचारी हजर होता. ना मास्क, ना ग्लोव्हज, ना गाॅगल. तशाच अवस्थेत त्याने मृताच्या नातलगांकडून शव उतरवून घेतले. त्या वेळी तो शवाच्या अगदी जवळही गेला होता. नंतर केवळ औपचारिकता म्हणून त्याने पीपीई किट परिधान केले. स्वत:च्या जिवाचीही पर्वा हे कर्मचारी करीत नाहीत, हे वास्तव आहे.

0