आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जळगाव:चार वर्षीय चिमुकलीच्या साक्षीवरून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या नराधमास जन्मठेप

जळगाव7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जळगाव : न्यायाधीश, वकिलांच्या प्रश्नांना दिली धाडसाने उत्तरे

आपल्यावर अत्याचार झाल्यानंतर एका चार वर्षांच्या चिमुरडीने न्यायालयात साक्ष दिली. न्यायाधीशांनी विचारलेल्या नऊ प्रश्नांची उत्तरे दिली. उलटतपासणीत बचाव पक्षाच्या वकिलाने विचारलेल्या चार नकारात्मक बाबी तिने खोडून काढल्या. या चिमुरडीच्या साक्षीवरून अखेर न्यायालयात आरोपीस दोषी धरून मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. न्यायाधीश आर. जे. कटारिया यांनी बुधवारी हा निकाल दिली. किशोर ऊर्फ पिंटू निंबा भोई (३८, रा. बेडरपुरा, नगरदेवळा, ता. पाचोरा) असे शिक्षा ठोठावलेल्या आरोपीचे नाव आहे.

२६ मार्च २०१९ रोजी किशाेर याने घराशेजारी राहणाऱ्या साडेतीन वर्षांच्या बालिकेस चॉकलेट देऊन घरात नेले. यानंतर आतून दरवाजा बंद करून बालिकेवर अत्याचार केला. बालिकेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून किशाेरविरुद्ध पाचोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच रात्री पोलिसांनी किशोरला हुडकून काढत अटक केली. सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय नलावडे यांनी तपास करून जिल्हा न्यायालयात दोषारोपत्र सादर केले होते.

२९ नोव्हेंबर २०१९ रोजी या खटल्यास सुरुवात झाली. या खटल्यात सरकार पक्षाने एकूण १० साक्षीदार तपासले. त्यात पीडित बालिकेची साक्ष महत्त्वाची ठरली. २१ डिसेंबर २०१९ रोजी या बालिकेने साक्ष दिली. या वेळी न्यायाधीशांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचे तिने उत्तर दिले. बचाव पक्षाच्या वकिलाचे मुद्दे खोडून काढले. खटल्याची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर या बालिकेवर न्याय झाला. न्यायालयाने किशोर याला दोषी धरून मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. सरकार पक्षातर्फे अॅड. केतन ढाके यांनी काम पाहिले.

बचाव पक्षाचे मुद्दे खोडले वकील : तुला कोणीच कुठे नेले नव्हते, तू खोटं सांगते आहेस ना? बालिका : मला पिंट्याने नेले होते. वकील : त्याने तुला काहीच खायला दिले नाही? बालिका : चॉकलेट दिले होते. वकील : तुझ्यासोबत काहीच घटना घडलेली नाही, तू खोटे बोलते आहेस? बालिका : माझ्यासोबत घटना घडली आहे.

न्यायाधीशांच्या प्रश्नांना बालिकेने दिलेली उत्तरे अशी... न्यायाधीश : तुझे नाव काय? बालिका : तिने नाव सांगितले. न्यायाधीश : तुला कोणी घरात नेले होते? बालिका : पिंट्या (किशोरचे टोपणनाव) न्यायाधीश : त्याने काय केले? बालिका : सूसू केली. न्यायाधीश : कुठे? बालिका : तिने गुप्तांगास हात लावून इशाऱ्याने सांगितले. न्यायाधीश : त्याने काय खाण्यास दिले? बालिका : चाॅकलेट दिले. न्यायाधीश : नंतर काय झाले? घरात कोण आले? बालिका : आई आली. न्यायाधीश : पिंट्याला ओळखशील का? बालिका : न्यायाधीशांनी दाखवलेला पिंट्याचा फोटो तिने ओळखला. न्यायाधीश : घडलेला प्रकार तू कोणाला सांगितला? बालिका : आईला सांगितला. न्यायाधीश : पोलिस स्टेशनमध्ये तुला कोणी माहिती विचारली? बालिका : दीदीने विचारले. (तिने महिला पोलिस उपनिरीक्षकास दीदी नावाने संबोधले)

किशाेरची मध्यवर्ती कारागृहात रवानगी...
गुन्हा घडल्याच्याच दिवशी पोलिसांनी किशाेरला अटक केली आहे. काही दिवसांच्या पोलिस कोठडीनंतर तो तेव्हापासून जिल्हा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे. आता शिक्षा ठोठावल्यानंतर त्याची मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात येईल.