आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन गटातला वाद विकोपाला:जळगावमध्ये दोघांना पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न, 15 जणांवर गुन्हा

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अमळनेर तालुक्यातील तरवाडे येथे दोन गटात झालेल्या वादात एका व्यक्तीसह त्याच्या मुलाच्या अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला गेला. तसेच या व्यक्तीच्या पत्नीचा विनयभंग केला आहे.

या प्रकरणी सोमवारी १५ जणांविरुद्ध विनयभंग, दंगल, प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकी घटना काय?

घटनेतील फिर्यादी यांनी गावात राहणाऱ्या काही लोकांविरुद्ध पोलिसात तक्रारी केल्या आहेत. सततच्या वादामुळे तक्रारी वाढत होत्या. या तक्रारी मागे घेण्यावरून पुन्हा वाद उफाळला. ३ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास तरवाडे गावी फिर्यादी हे घरात बसले होते. त्यावेळी विजय सदाशिव पाटील, रवींद्र नाना पाटील, संदीप सदाशिव पाटील, सदाशिव वामन पाटील, सतीश नागराज पाटील, रोहीत सतीश पाटील, बाबुराव आधार पाटील, धीरज रामकृष्ण पाटील, रामकृष्ण अभिमन पाटील, वंदना रामकृष्ण पाटील, सुनंदा सतीश पाटील, चंद्रकला नागराज पाटील, मंगलाबाई सदाशिव पाटील, शीतल संदीप पाटील, विजय सदाशिव ची बायको (सर्व रा. तरवाडे, ता. अमळनेर) यांनी फिर्यादीच्या घरात जबरदस्तीने प्रवेश केला.

पेट्रोल टाकून पेटवले

सर्वांनी लोखंडी रॉड, लोखंडी पाइप, लाकडी दांडका, काठ्या, चाकू, दगड आणि पेट्रोलची बॉटल आणून घरामध्ये शिरले. घरातील सोप्यावरच्या गादीवर पेट्रोल टाकून गादी पेटवून गादीसह फिर्यादीच्या मुलाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. तसेच घरातील काही वस्तू देखील जाळल्या. लोखंडी कपाट फोडून त्यातील ६५ हजारांची रोकड व मुलाच्या हातातील १७ हजारांचा विवो कंपनीचा मोबाइल व गळ्यातील १५ ग्रॅमची चैन आणि फिर्यादीच्या गळ्यातील ६ ग्रॅमची मणी मंगळसूत्र ओरबाडले.

विनयभंग केला

मंगळसूत्र ओढताना फिर्यादीच्या पत्नीचा विनयभंग केला. फर्निचरची मोडतोड केली. तसेच दंगल घडवून हल्ला केला. या प्रकरणी १५ जणांविरुद्ध विनयभंगसह दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक जयेश खलाणे तपास करीत आहेत. या घटनेमुळे गावात प्रचंड खळबळ उडाली होती. ग्रामस्थांनी मध्यस्थी करून फिर्यादीसह त्याच्या कुटुंबीयांची सुटका केली.

बातम्या आणखी आहेत...