आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोफत असलेल्या सुरक्षा संचांची साडेपंधराशे रुपयात विक्री:जीव धोक्यात घालून काम करणाऱ्यांच्या योजनेत शेतकऱ्यांची घुसखोरी

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे नोंदणीकृत बांधकाम कामगारांना मोफत देण्यात येत असलेला अत्यावश्यक व सुरक्षा संच एजन्ट दीड हजार रुपये घेऊन लाभ देत आहेत. संचांचे वाटप करतानाही त्यांच्याकडून 50 रुपये घेतले जात आहेत. कामगार नसतानाही या योजनेत घुसखोरी केलेल्यांकडून लाभ लाटला जात असल्याचे 'दिव्य मराठी'ने केलेल्या पाहणीत आढळून आले आहे.

कामगार मंडळातर्फे जिल्ह्यातील 42 हजार 622 नोंदणीकृत बांधकाम कामगारांना अत्यावश्यक व सुरक्षा संच (पेटी) निशुल्क वाटप केले जात आहे. या योजनेंतर्गत संच वाटप करण्याचे कंत्राट राज्यस्तरावरुन इंडो अलाईड या खासगी कंपनीला देण्यात आलेले आहे. बांधकाम कामगारांसह 53 प्रकारची कामे करणारे कामगार या योजनेसाठी पात्र आहेत.

रांगेत श्रीमंत लोक

खोटेनगरजवळ एका कॉम्प्लेक्समध्ये त्या संचांचे कामगारांना वाटप करण्यात येत आहे. दिव्य मराठी प्रतिनिधीने तेथील महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचा फलक लावलेल्या कार्यालयाला भेट दिली. कामगारांची रांग लागलेली होती. तेथे कामगारांना कागदपत्र घेऊन संच देण्यात येत होते. तेथील व्यक्तीने सुपरवायझर सुयोग बोरसे यांच्यामार्फत संच वाटप करण्यात येत असल्याचे सांगितले. रांगेत कडक इस्त्री केलेल्या व्यक्ती दिसल्या. त्यांच्या कामाविषयी विचारले असता शेती करत असल्याचे सांगितले.

50 रुपये घेऊन संच

मनोज सावळे रा. नशिराबाद, शेषराव पाटील रा. मुक्ताईनगर, विजय पुंडलिक वंजारी, रा. तळेगाव ता. जामनेर व गणेश रमेश पाटील रा. राहेरा ता. जामनेर हे शेतकरीही रांगेत उभे होते. त्यांच्याकडे दोन ते दहा एकरपर्यंत शेती असल्याचेही त्यांनी सांगितले. कामगार नसतानाही दीड हजार रुपये देऊन संच घेण्यासाठी आले होते. त्यांना 50 रुपये घेऊन त्यांना संच देण्यात आले.

एजंटने पैसे घेऊन केली कामगार म्हणून नोंदणी

गणेश पाटील या शेतकऱ्याने आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, माझ्याकडे सहा एकर शेती आहे. गावातील एजन्टने रोख दीड हजार रुपये घेतले. त्यानेच कामगार म्हणून माझी नोंदणी केली. त्यानंतर माझ्यासह तालुक्यातील इतर लाभार्थी संच घेण्यासाठी येथे आलो आहोत. येथेही संच देण्यासाठी ५० रुपये घेतले आहेत.

संचामध्ये या वस्तूंचा समावेश

सुरक्षा संचात हेल्मेट, हार्नेस, सेफ्टीशूज, इअर प्लग, सेफ्टी ग्लोव्हज, मास्क, सुरक्षा संच : चटई, मच्छरदाणी, सोलर टॉर्च, जेवणाचा डबा, पाण्याची बाटली, बॅग व या सर्व वस्तू ठेवण्यासाठी पत्र्याची पेटी या गोष्टींचा समावेश आहे.

जिल्ह्यातील कामगारांची स्थिती.

  • नोंदणीसाठी आलेले अर्ज - 55475
  • मंजूर अर्ज - 42622
  • नामंजूर - 10746
  • प्रलंबीत - 1326
  • त्रुटी असलेले - अर्ज 781
बातम्या आणखी आहेत...