आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागर्भपात करण्याचा परवाना नसताना देखील विवाहितेचा गर्भपात केला, यावेळी झालेल्या रक्तस्त्रावामुळे संबधित महिलेचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी दाखल गुन्ह्यात महिला डॉक्टरला न्यायालयाने पाच वर्षे कैद व 52हजार रुपये दंडाची शिक्षा बुधवारी ठोठावली.
डॉ. सुरेखा शामलाल तोतला (वय 51, रा. मारवाडी गल्ली, एरंडोल) असे शिक्षा ठोठावलेल्या महिला डॉक्टरचे नाव आहे.घटना अशी की, डॉ. सुरेखा यांचे रुग्णालय आहे. परंतु, उपचारासाठी आलेल्या महिलांचे गर्भपात करावे हा परवाना डॉ. सुरेखा यांच्याकडे नव्हता. तरी देखील 22 जून 2012 रोजी डॉ. सुरेखा यांनी कुसूमबाई बाळासाहेब मराठे (वय 35, रा. तोडी, ता. एरंडोल) यांचा गर्भपात केला.
यामुळे अती रक्तस्त्राव होऊन कुसूमबाई यांचा त्याचा दिवशी रुग्णालयातच मृत्यू झाला. मृतदेह शासकीय रुग्णालयात नेल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट झाले होते. या प्रकरणी कोणीही तक्रारदार पुढे येत नसल्यामुळे अखेर एरंडोल पोलिस ठाण्याचे तत्कालिन निरीक्षक मोहन बनकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन डॉ. सुरेखा यांच्या विरुद्ध कुसूमबाई यांच्या मृत्यूस कारणीभुत ठरल्यासह पीसीपीएनडी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिस तपास पुर्ण झाल्यानंतर जिल्हा न्यायालयात दोषारोप दाखल करण्यात आले. सुरूवातीला न्यायाधीश पी. वाय. लाडेकर व डी. ए. देशपांडे यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. यानंतर सध्या न्यायाधीश एस. एस. सापटणेकर यांच्या न्यायालयात सुनावणी सुरू होती.
न्यायाधीशांसमोर डॉ. संग्राम पाटील, नाना मराठे, अशोक काकडे, तत्कालिन तहसिलदार इंदीरा चौधरी, मृत कुसूमबाई यांच्या जेठाणी कल्पनाबाई पाटील, पती बाळासाहेब पाटील, शवविच्छेदन करणारे डॉ. अजित पाठक व पोलिस निरीक्षक बनकर यांच्या साक्ष महत्त्वाच्या ठरल्या. सुनावणीअंती न्यायालयाने डॉ. सुरेखा यांना दोषी धरुन शिक्षा ठोठावली. सरकार पक्षातर्फे अॅड. प्रदीप एम. महाजन यांनी काम पाहिले. तर पैरवी अधिकारी ताराचंद जावळे, केसवॉच धनंजय सोनवणे व पंकज पाटील यांची सहकार्य केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.