आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावमध्ये ऑनलाईन 10 लाखांची फसवणूक:सायबर पोलिसांनी दोन तासात मिळवले पैसे परत

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गृहकर्जाचा हप्ता मिळाला नाही अशी थाप मारुन भामट्यांनी एका व्यक्तीची 10 लाख रुपयात ऑनलाईन फसवणूक झाली होती. संबधित व्यक्तीले तात्काळ सायबर पोलिसांना माहिती दिल्यामुळे तांत्रिक तपास करुन अवघ्या दोन तासात दोन बँकांच्या खात्यातून रक्कम गोठवली. यानंतर दोन दिवसात संबधित व्यक्तीला हे पुर्ण पैसे परत करण्यात यश आले आहे.

17 नोव्हेंबर रोजी सतीश काळमेघ (वय 50) यांना एका अनोळखी मोबाईल क्रमांकावरुन फोन आला होता. ‘एचडीएफसी बँकेच्या हाऊसींग लोन डिपार्टमेंटमधून बोलत असून तुमचा लोनचा हप्ता कपात झाला नाही. आजच्या आज ऑनलाईन हप्ता नाही भरला तर जास्त दंड लागेल’ असे धमकावून काळमेघ यांना ऑनलाईन हप्ता भरण्यास भाग पाडले. त्यासाठी भामट्यांनी त्यांच्या मोबाईलवर एक लिंक पाठवून फॉम भरण्यास सांगीतले. हा फॉर्म भरताच काळमेघ यांच्या बँक खात्यातून 10 लाख रुपये परस्पर वर्ग झाले होते.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच काळमेघ यांनी तात्काळ सायबर पोलिस ठाणे गाठले. पोलिस निरीक्षक लिलाधर कानडे, सचिन सोनवणे व श्रीकांत सोनवणे यांनी क्षणाचाही विलंब न करता लागलीच तांत्रिक तपासाला सुरूवात केली. काळमेघ यांच्या बँक खात्यातून एसबीआय, वेस्ट बँगॉल येथील एका खात्यात रक्कम वर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. अवघ्या दोन तासात सुरूवातीला 9 व नंतर 1 असे एकूण 10 लाख रुपये वर्ग झालेले दोन्ही बँक खाती पोलिसांनी गोठवून घेतले. यानंतर काळमेघ यांच्या बँकेशी संपर्क साधून ही रक्कम पुन्हा त्यांच्या खात्यात जमा केली. दोन दिवसांनी काळमेघ यांना ही रक्कम परत मिळाली.

अनोळखी लोकांना माहिती देऊ नका

कोणत्याही नागरीकांनी अनोळखी मोबाईल क्रमांकावरुन येणाऱ्या लोकांना बँक खात्याची माहिती देऊ नये. अनोळखी व्यक्तींसाेबत ऑनलाईन व्यवहार करणे टाळावे. ऑनलाईन व्यवहारांचे पासवर्ड स्ट्राँग ठेवावे. फसवणूक झाल्यास तात्काळ सायबर पोलिस ठाण्यात संपर्क करावा. अशी माहिती पोलिस निरीक्षक कानडे यांनी दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...