आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

धक्कादायक:जळगाव जिल्हा आत्महत्येच्या घटनांनी हादरला; सात जणांनी संपवले जीवन

जळगाव10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आत्महत्येची कारणे वेगवेगळी, पोलिसांचा तपास सुरू

जळगाव जिल्हा बुधवारी आत्महत्या आणि खुनाच्या घटनांनी हादरला. वेगवेगळ्या घटनांत सहा जणांनी मृत्यूला कवटाळले, तर एका घटनेत एका विवाहितेची हत्या करण्यात आली. एका घटनेत शाळकरी मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.

सावद्यात कुऱ्हाडीने डोक्यात वार करून विवाहितेची हत्या

सावदा | येथून जवळच असलेल्या चिनावल येथील २४ वर्षीय विवाहितेचा जुन्या वादातून कुऱ्हाडीने डोक्यात घाव घालून खून झाल्याची घटना मंगळवारी (दि.१६) रात्री घडली. या घटनेत विवाहितेचा आठ वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणातील संशयिताला पोलिसांनी अटक केली आहे. १५ दिवसांपूर्वी संशयित भोला मोहस्या बारेला (३८) याने विवाहिता ईला बारेला (२४) हिची छेड काढली होती. यामुळे विवाहितेचा पती मुकेश बारेला याने संशयिताला जाब विचारला होता. त्याचा राग आल्याने संशयिताने विवाहितेच्या मानेवर कुऱ्हाडीने घाव घातला. या घटनेत विवाहितेचा मुलगा कुणाल बारेला (८) याने संशयिताला विरोध केला. त्यामुळे संशयिताने त्याच्याही मानेवर वार केला. त्यामुळे कुणाल गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर रावेर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संशयिताला पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

पत्नी माहेरी गेल्याने तरुणाची नदीत उडी घेऊन आत्महत्या

जळगाव| सततच्या कौटुंबिक वादातून ३७ वर्षीय तरुणाने बांभोरी नदीपात्रातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी १०.३० वाजता घडली. पत्नी माहेरी निघून गेल्यामुळे हा तरुण तणावात होता, अशी माहिती त्याच्या मोठ्या भावाने दिली. संतोष फकिरा अंभोरे (वय ३७, रा. बांभोरी) असे मृत तरुणाचे नाव आहे. संतोष हा सध्या वाळूच्या ठेक्यावर हातमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. गेल्या आठवड्यापासून घरगुती वादातून पत्नीसोबत त्याचे भांडण झाले. यानंतर त्याची पत्नी कढोली येथे माहेरी निघून गेली होती. यामुळे तणावात असलेल्या संतोष याने बुधवारी बांभोरी नदीपात्रातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. त्याने उडी घेतल्याचे बांभोरी गावातील काही ग्रामस्थांनी पाहिले होते. तो पोहण्यासाठी गेला असल्याचा लोकांचा समज झाला. बराच वेळा तो बाहेर न आल्याने अखेर ग्रामस्थांना शंका आली. अर्ध्या तासानंतर तरुणांनी त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.

आजाराला कंटाळून विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

जळगाव| दुर्धर आजाराच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी १० वाजता उघडकीस आली. बळीराम पेठमध्ये राहणारी ही विवाहिता आहे. आशा सुनील कुमावत (३९, रा. बळीराम पेठ) असे मृत विवाहितेचे नाव आहे. आशा या गेल्या काही महिन्यांपासून आजारी होत्या. त्यांना दुर्धर आजार जडला होता. त्यांच्यावर नाशिक येथील डॉक्टरांचे औषधोपचार सुरू होते. त्यांचे पती सुनील नानासाहेब कुमावत हे पाटबंधारे विभागात शिपाई म्हणून नोकरीस आहेत. बुधवारी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास ते कामावर निघून गेले, तर मुलगा शाळेत गेला होता. यानंतर १० वाजता आशा कुमावत यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेहाचा पंचनामा केला. यानंतर वैद्यकीय महाविद्यालयात मृतदेह आणला होता. या प्रकरणी सुनील कुमावत यांच्या खबरीवरून पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

कौटुंबिक कलहातून ४४ वर्षीय व्यक्तीची आत्महत्या

यावल| तालुक्यातील किनगाव बुद्रुक येथे ४४ वर्षीय व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी दुपारी उघड झाली. संतोष एकनाथ साळुंके असे मृताचे नाव आहे. कौटुंबिक कलहातून त्यांनी आत्महत्या केली असावी, असा अंदाज व्यक्त होत आहे. किनगाव बुद्रुक गावातील चुंचाळे रस्त्यालगत धम्मनगरी भागातील रहिवासी संतोष एकनाथ साळुंके हे पत्नी व दोन मुलींसह राहत होते. पंधरा दिवसांपूर्वीच त्यांचे पत्नीसाेबत भांडण झाले होते. त्यामुळे मृताची पत्नी दोन्ही मुलींना घेऊन माहेरी निघून गेली होती. त्यामुळे संतोष निराश होता. बुधवारी साळुंके हे घराबाहेर आलेच नाहीत. त्यामुळे शेजाऱ्यांनी घरात पाहिलेे असता त्यांनी गळफास घेतल्याचे समोर आले.

यावल : शेतकरी दांपत्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

यावल| शहरातील शेतकरी दांपत्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी घडली. भागवत ऊर्फ बाळू दिगंबर पाटील (६१) आणि विमलबाई भागवत पाटील (५४) असे मृत दांपत्याचे नाव आहे. या विहिरीला ४० फूट पाणी होते. त्यामुळे मृतदेह बाहेर काढण्यास चार तास लागले. शहरातील सुतार वाड्याजवळील महाजन गल्लीतील रहिवासी मृत दांपत्याच्या पश्चात दोन विवाहित मुली असून, त्या सुखाने नांदत आहेत. बुधवारी सकाळी ५.४५ वाजता हे दांपत्य घरून निघाले. ६.१५ वाजेच्या सुमारास फैजपूर रस्त्यावरील महाविद्यालयासमोर, निर्मल नथ्थू चोपडे यांच्या शेतातील विहिरीत दोघांनी उडी घेऊन आत्महत्या केली. रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांनी ही घटना पाहिल्याने त्यांनी शहरात माहिती दिली. मृत भागवत पाटील यांचे भाऊ तथा बाजार समितीचे संचालक पुंजो दिगंबर पाटील यांना घटनेची महिती देण्यात आली. त्यानंतर पोलिस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी दोघांचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढले. दरम्यान, या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

बातम्या आणखी आहेत...